

वास्को : पुढती वृत्तसेवा
मुरगाव पालिका इमारतीसमोरच्या पदपथावरील भटक्या लोकांना वास्को पोलिसांनी हुसकावून लावल्यानंतर आता तेथे नवीन भटक्या लोकांनी आपले बस्तान मांडल्याचे दिसत आहे. या पदपथावरील सिमेटच्या बाकड्यावर शुक्रवारी (दि. २) सकाळी उशारीपर्यंत काहीजण मस्तपैकी झोपल्याचे वास्कोवासियांच्या नजरेस पडले. तेथील तसेच इतर पदपथ मोकळे राहावेत यासाठी तेथे पोलिसांनी गस्त घालण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मुरगाव पालिका इमारतीसमोरच्या पदपथावरील भटक्या लोकांना वास्को पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी हसकावून लावले होते. गेले काही महिने त्या पदपथांवर बस्तान मांडून नागरिकासमोर गैरसोयी करणारया भटक्या लोकाना पोलिसानी हुसकावून लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. तेथील पदपथ मोकळे झाल्याने दुरिस्ट टॅक्सीवाले खूष झाले होते.
तथापी शुक्रवारी तेथे नवीन पाहणे हजर झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याप्रकरणी वास्को पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. पदपथ संबंधितानी आपल्या ताब्यात घेतल्याने तसेच त्यांच्यामध्ये होणाऱ्या मारामारीमुळे नागरिकांनी मोठा त्रास सहन करावा लागत होता. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेताना काही वृध्द भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी आश्रमात केली. मुरगाव पालिका इमारतीसमोरच्या दुतर्फा पदपांचे सौंदर्याकरण येथील उद्योजक नाना बांदेकर यांनी केले होते. तेथे बसण्यासाठी बाकडे ठेवण्यात आले होते. तसेच लोकांच्या मनोरंजनासाठी संगीत लावले जात होते. त्यामुळे तेथे लोकांना निर्वातपणे बसता येत होते.
कालांतराने तेथे योग्य देखभाल अभावी बाकडे नाहीशे झाले. पदपथाची दुरावस्था झाली. त्यानंतर गेल्या मुरगाव पालिकेने पालिका इमारतीचे नूतनीकरण कामासह तेथील एका पदपथावर नवीन पेव्हर्स बसविले होते. तथापी समोरचा पदपथ दुरावस्थेतच होता. त्यातच भूमिगत केबलासाठी त्या पदपथावर खोदकाम करण्यात आले होते.
या दोन्ही पदपथावर भटक्या व भिकाऱ्यांनी बस्तान मांडल्याने नागरिकांना पदपथाचा वापर करता येत नाही तेथे बसण्यासाठी सिमेंटची बाक आहेत, तेसुध्दा भिकारी किंवा भटक्या लोकांनी अडविले आहेत. त्यामुळे एकंदर त्या भटक्या व भिकारयांनी 'माझा पदपथ' अशी व्याख्या तयार केली असावी. या भटक्या लोकांचे कुटुंबे तेथेच स्वयंपाक, झोपणे, आंघोळ करणे, कपडे सुकविणे वगैरे गोष्टी तेथेच करतात. यापैकी काहीजण संध्याकाळी मद्यप्राशन करून, तेथे गोंधळ घालून शांतता भंग करतात.
या भटक्या व भिकाऱ्यांना एका संस्थेचे सदस्य सकाळी न्याहारीसाठी सामोसा, पाव देतात. त्यानंतर दुपारी व रात्री जेवण आणून देतात. त्यामुळे त्यांची योग्य सोय तेथे झाली आहे. काहीवेळा तेथे चिकन, मटण शिजविले जाते, तेव्हा त्या संस्थेने दिलेले अन्न त्या पदपथावर इकडेतिकडे टाकले जाते. या भटक्या लोकांचे वास्तव पदपथावर असल्याने तेथेच नैसर्गिक केली जाते. त्यामुळे तेथे दुर्गंधी पसरत आहे. तेथे आपली वाहने उभी करणाऱ्या टूरिस्ट टॅक्सीवाल्यांना सदर त्रास सहन करावा लागतो.
कारवाईत सातत्य हवे
याप्रकरणी संबंधितानी दखल घेऊन त्या भिकारी व भटक्या लोकांची योग्य ठिकाणी रवानगी करावी, अशी मागणी सतत करण्यात येत होती. याप्रकरणी वास्को पोलिसांनी कारवाई करताना तेथे वस्तान मांडलेलेया भटक्या लोकांना दुसरीकडे जाण्यास भाग पाडले, त्यामुळे पदपथ गेले दिवस मोकळा दिसत होता. ही कारवाई अशीच चालूच ठेवण्याची गरज आहे. नाही तर ते भटके पुन्हा त्या पदपथावर बस्तान मांडतील यात शंकाच नाही.
समस्येकडे दुर्लक्ष झाल्यानेच संख्या वाढली
यापूर्वी मुरगावच्या माजी उपनगराध्यक्ष व नगरसेविका श्रध्दा महाले यांनी या भटक्या व भिकारी लोकांची रवानगी निरनिराळ्या आश्रमात केली होती. त्यामुळे सर्व पदपथ मोकळे झाले होते. तसेच वास्को पोलिस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक नोलास्को रापोझ यांनीही भटक्याविरोधात कारवाई केल्याने पदपथ मोकळे झाले होते.
वास्को शहर व परिसरात भटके लोक नजरेस पडत नव्हते. त्यानंतर मात्र या भटक्याच्या वास्तवाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांची संख्या वाढत गेली आहे. त्यामुळे दुतर्फा पदपथ त्यांच्या ताब्यात गेले आहेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.