

पणजी : पुढारी वृत्तसेवा
चिंबल येथे सुरू असलेल्या युनिटी मॉलच्या बांधकामावर उत्तर गोवा प्रधान जिल्हा न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या प्रकरणात गोवा पर्यटन विकास महामंडळाला (जीटीडीसी) पुढील आदेशापर्यंत हे काम जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
चिंबल ग्रामस्थांच्या वतीने चिंबल जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी यापूर्वी गटविकास अधिकाऱ्यांनी या बांधकामाला परवानगी देण्याचा आदेश जुने गोवे पंचायतीला दिला होता, त्याला आव्हान दिले आहे. हे बांधकाम पंचायतीने दिलेल्या परवानगीनुसार सुरूच असल्याने शिरोडकर यांनी फेरअर्ज सादर केला आहे.
त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायालायत सादर झालेल्या फेरअर्ज याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सद्यस्थितीत सुरू असलेले सर्व बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले.
युनिटी मॉलच्या उभारणीसंदर्भात आवश्यक परवानग्या, कायदेशीर प्रक्रिया तसेच पर्यावरणीय बाबींचे पालन झाले आहे की नाही, यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, ८ जानेवारीपर्यंत कोणतेही नवीन काम, बदल किंवा बांधकाम पुढे नेण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे.
परिणामांबाबत चिंता व्यक्त
दरम्यान, युनिटी मॉल प्रकल्पाला स्थानिक पातळीवर विरोध होत असून, परिसरातील नागरिक, सामाजिक संघटना व पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पामुळे होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे सध्या तरी प्रकल्पाच्या कामकाजाला ब्रेक लागला असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.