

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये झा लेल्या भीषण अग्नितांडवानंतर राज्य सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लब्सविरोधात मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, वागातोर येथील नाईट क्लब कॅफे २ सील करण्यात आला आहे. ओझरान वागातोर येथील टेकडीवर असलेल्या सुमारे २५० आसनी क्षमतेच्या कॅफे २ वर शनिवार, १३ रोजी कारवाई करण्यात आली आहे.
या क्लबकडे अग्निशमन दलाचा अग्निसुरक्षेशी निगडीत ना हरकत दाखला नव्हता, तसेच बांधकामाला आवश्यक असलेली स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी (संरचनात्मक स्थिरता) नसल्याचे आढळले. वरिष्ठ नागरी सेवा अधिकारी कबीर शिरगावकर यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त अंमलबजावणी समितीने ही कारवाई केली.
कबीर शिरगावकर यांच्या नेतृत्वाखालील या समितीमध्ये कार्यकारी अभियंता (पीडब्ल्यूडी मडगाव), निखिल पालेकर (पोलीस निरीक्षक, एस्कॉर्ट सेल), सुशील मोरसकर (स्टेशन फायर ऑफिसर), आणि आशिष राजपूत (कार्यकारी अभियंता, डिव्हिजन, वेर्णा) यांचा समावेश होता. ही समिती बार्देश तालुक्यातील किनारी भागातील क्लब्सची तपासणी करण्यासाठी खास नियुक्त करण्यात आली आहे. समितीच्या निर्देशानुसार बार्देशच्या मामलेदार यांनी क्लबला सील ठोकले.
उपसरपंच, पंचांची पोलिसांकडून चौकशी
म्हापसा : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये झालेल्या अग्निकांडानंतर हणजूण पोलिसांनी या ठिकाणी झालेल्या पंचवीस जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून संबंधितांची चौकशी सुरू केलेली आहे.
आतापर्यंत ५० ते ६० जणांची जबानी घेण्यात आली असून चौकशी सत्र सुरूच आहे. याच अनुषंगाने हणजूण पोलिसांनी हडफडे पंचायतीच्या पंच सदस्यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. विद्यमान सचिव धर्मेंद्र गोवेकर यांनी पंचायतीतील संबंधित दस्तऐवज पोलिसांकडे सादर केले होते.
शनिवारी सकाळी उपसरपंच सुषमा नागवेकर, पंच विनंती मोरजकर व स्टेफी फर्नांडिस यांना चौकशीसाठी पोलिस स्थानकात बोलावण्यात आले होते. त्यांचा जबाब नोंदवून त्यांना जाऊ देण्यात आले. आम्ही चौकशीला सहकार्य करीत आहोत. पोलिसांनी आम्हाला जे काही विचारले ते त्यांना सांगितले आहे.
याविषयी आम्हाला जास्त काही बोलायचे नाही, असे उपसरपंच सुषमा नागवेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, बार्देशचे गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास तसेच माजी निलंबीत पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी आज पोलिसांच्या चौकशीला हजेरी लावली होती.