

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता मिळवली तर मांडवीतील सर्व तरंगते कॅसिनो हटवण्यात येतील. पणजी महापालिका निवडणुकीत गरज पडल्यास उत्पल पर्रीकर यांच्या पॅनला काँग्रेस पाठिंबा देईल, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी भेट घेऊन ते गोव्यात आल्यानंतर पत्रकारांशी पर्वरी येथील विधानसभा संकुलात त्यांच्या कार्यालयात आज बुधवारी संवाद साधला. ते म्हणाले, भू माफिया, भ्रष्टाचार, लूट, हप्तावसुली आणि गुन्हेगारीपासून गोव्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वजण लढत आहेत.
प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सर्व विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात एकत्रित विरोधकांनी भाजप सरकारचा पर्दाफाश कसा केला, हे जनतेने पाहिले.
त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून गोव्याचा वारसा, संस्कृती, जमीन, बंधुता आणि शांतता जपण्यासाठी तोच एकोपा पुढेही कायम ठेवू, असे आलेमाव म्हणाले. २०२७ मध्ये काँग्रेस सत्तेत येईल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.
त्यानंतर जनतेला काय हवे आणि काय नको, हे ठरवण्याची संधी दिली जाईल. काँग्रेस नेहमीच जनतेसोबत राहिली असून जनविरोधी प्रकल्प रद्द केले असल्याचेही ते म्हणाले.