

उसगाव–गांजे ही पंचायत सध्या फोंडा तालुक्यात आहे. मात्र, पूर्वी गांजे गावाचा समावेश सत्तरीत होता. पणजीपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव सुमारे २५ हेक्टरमध्ये विखुरलेले आहे. गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर, निसर्गरम्य आणि शांत वातावरणात नदीकाठी हे गाव वसले आहे.
हिरवळीच्या भातशेती आणि नद्यांच्या सान्निध्यात वसलेले हे गाव शांतता शोधणाऱ्यांसाठी उत्तम ठिकाण आहे. लोकधर्म, भाषा आणि संस्कृतीच्या दृष्टीने आजही उसगाव गावावर सत्तरीचा विशेष प्रभाव जाणवतो. येथील मंदिरे व जुन्या वास्तू गावच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात. उसगाव हा गोव्याच्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्यासाठी एक आदर्श गाव आहे.
कर्नाटकातील देगाहून वाहत येणारी म्हादई नदी गवाळी येथे यूटर्न घेऊन गोव्यातील कडवळ या गावात प्रवेश करते. याच नदीवर असलेल्या कृष्णापूर येथे महसिर नावाच्या माशांना लोक देवस्वरूपात पूजतात व त्यांचे जतन करतात. हीच नदी पुढे उस्ते, गांजे करत उसगावात पोहोचते. उसगाव हे नाव आपण खाण्यासाठी किंवा साखर, गूळ बनवण्यासाठी वापरणाऱ्या ऊसावरून पडले असावे.
आज विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर असलेला उसगाव हा गाव व्यापार आणि उद्योगात गुंतलेल्या लोकांनी गजबजलेला व कर्तृत्वाने गाजलेला होता. एकेकाळी म्हादई नदीवर उसगाव आणि गांजे ही दोन महत्त्वाची बंदरे होती. धारबांदोडा, खांडेपार, हरवळे, पिसुर्ले या गावांनी वेढलेला जंगलसंपन्न असा हा गाव आहे. बोंदला अभयारण्य व साळवली धरण येथून जवळच आहे.
उसगाव–पाळी पूल खांडेपार नदीवर असून या पुलामुळे उसगाव व पाळी या गावांमधील वाहतूक सुलभ झाली आहे. या नदीवर दोन पूल आहेत. १९३३ मध्ये पोर्तुगीजांनी लोखंडी पूल बांधला होता, तर २००९ मध्ये नवीन चार लेनचा पूल बांधण्यात आला. या नदीकाठी माड, पिल्लोमाड ही झाडे आहेत. भिल्लेमाड हे झाड कटांधर (सिव्हेट कॅट) या प्राण्याचे निवासस्थान आहे. जवळच संत जोसेफ चॅपेल व शाळा आहे.
भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री असताना अच्युत उसगावकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते होते. ते आमदार म्हणून निवडून आले होते. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे ते वडील होते.
तिराळ टाकवाडा – उसगाव
तिराळ टाकवाडा येथे लाकडी बंधारा आहे. येथे भरतीच्या वेळी पाणी आत येते. या ठिकाणी एकेकाळी भाताचे पीक घेतले जायचे. पेंडमस प्रजातीतील केवडा व बोडगीणीची झाडे मोठ्या प्रमाणात येथे आढळतात. या भूखंडाला जणू काही कृषी-बागायतीचा वारसाच लाभला आहे. हा भाग चिकणमातीसाठी प्रसिद्ध आहे. एकेकाळी कुंभार समाजातील लोक येथे स्थायिक होते; मात्र पुढे तेथून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले. या गावात नागाला नागनाथ म्हणून पूजले जाते.
श्री आदिनाथ मंदिर
आदिनाथ मंदिरातील सूर्यमूर्ती मार्तंड भैरवाच्या स्वरूपातील आहे. विला मिशा, दादी आहे. प्रा. राजेंद्र केरकर यांनी सांगितले की, येथे पूर्वी तीन मूर्ती होत्या. त्यातील एक मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली, दुसरी गोवा संग्रहालयात आहे आणि तिसरी मंदिराच्या बाहेर होती, जी पाण्यात विसर्जित करण्यात आली. च्यारी समाजाने या मंदिराचे लाकडी काम केल्याची माहिती मिळते. त्यावर ‘सश्णो च्यारी’ यांचे नाव कोरलेले आहे.
श्री मार्तंड भैरव हे भगवान सूर्यदेवाचे शक्तिशाली रूप आहे. लोक त्यांची तेजस्वी प्रकाशस्वरूप स्वामी म्हणून पूजा करतात. या मंदिरात एक महत्त्वाची पूजा ‘सप्ताह’ म्हणून साजरी केली जाते. भात कापणीनंतर आनंद व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो, असे गावकऱ्यांनी सांगितले. या उत्सवात गावातील सर्व वाड्यांवरून एकेक करून रात्र साजरी केली जाते. यानिमित्त भजनाचाही कार्यक्रम होतो. गव्हाच्या हिंगाच्यावर कळस ठेवून त्यात मोठी समई पेटवली जाते. ही समई देवासमोर सात दिवस सतत पेटत असते.
धनाफातर
हे ठिकाण एक नैसर्गिक आश्चर्य म्हणून प्रसिद्ध आहे. येथे असलेला भला मोठा दगड ‘गंत्रोखडक’ म्हणून ओळखला जातो. या दगडावर दगड आपटल्यास मंदिरातील घंटा वाजल्यासारखा आवाज येतो, म्हणून लोक त्याला धनाफातर असे म्हणतात. अशा प्रकारचे गढी दगड बोंदला जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतात.
म्हादई ही उसगावची जीवनधारा आहे. तिच्यामुळे जवळपास औद्योगिक वसाहत असूनही गावात हिरवळ टिकून आहे. येथील लोक आजही कमी प्रमाणात का होईना, शेती व बागायती करणे पसंत करतात. नव्या पिढीने नागरी सोयीसुविधांमध्येच मश्गूल न होता आपल्या पारंपरिक चालीरीती व व्यवसाय जपण्याची गरज आहे.
पाळी : श्री मल्लिकार्जुन मंदिर
हे एक प्राचीन मंदिर आहे. ‘पाली’ म्हणजे ‘पलिका’—शेतीशी निगडित अर्थ असलेला शब्द. जे लोक गाव डोंगरी येथून स्थलांतरित झाले, ते ब्राह्मणी मायेचे भक्तगण आहेत. ब्राह्मणी मायेच्या मूर्तीच्या हातात दोन फणा धरलेले साप आहेत. तिचे अस्तित्व येथील देवराईत आहे. या देवराईला ‘ब्राह्मणों मायेची राय’ असे म्हटले जाते.
या देवराईत घोटिंग, खष्ट, त्रिफळा, घिल्लोमाड असे अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. या सर्व वनस्पती भूजल पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात. उसगावच्या उंडीवाड्यावर ग्रामदेवता भूमिका वारुळाच्या रूपात पूजली जाते. हे मंदिर पूर्वीपासून जागृत देवस्थान म्हणून नावारूपास आलेले आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आई शेवंती मंगेशकर यांनी आपल्या मामाच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामासाठी आर्थिक सहाय्य केले होते. पूर्वी हे मंदिर वृक्षवेलींनी समृद्ध अशा देवराईत वसलेले होते. या गावात एक सुंदर व पवित्र तळे आहे. पूर्वी येथे शेती व बागायतीसाठी सिंचन केले जात होते. निसर्गाने एकेकाळी नटलेला हा गाव आज झपाट्याने बदलत चालला असून येथील पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची खंत प्रा. केरकर यांनी व्यक्त केली आहे.