

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
मुंगुल येथील नाक्यावर दोन गटांतील पूर्व वैमनस्यातून झालेला गोळीबार व गँगवॉर प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी अटक केलेल्या १३ जणांना येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी जामीन मंजूर केला आहे.
सर्वांना वैयक्तिक ५० हजार रु. व एका हमीदराच्या बोलीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रकाश वेल्मा, राजेश वेलमा, धनंजय पुंडलिक तलवार, अक्षय पुंडलिक तलवार या बंधुसह गौरंग कोरगावकर, बाशा शेख, सुनिल बिलावर, ज्योस्टन फर्नांडीस, महमद अली, वासु कुमार, अमर कुलाल, व्हवेल्ली डिकोस्ता व अविनाश अमृत गुंजीकर यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या गोळीबार प्रकरणात जखमी झालेले व साक्षीदारांना धमकी देऊ नये, तसेच साक्षीदारावर दबाव आणू नये, प्रत्येक सुनावणीला न्यायालयात उपस्थित रहावे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्याच्या बाहेर जाऊ नये इत्यादी अटी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना घातलेल्या आहेत.
दहा जणांचा जामिनासाठी अर्ज;
आज सुनावणी मुंगुल गैंगवॉर प्रकरणी १३ जणांना जामीन मंजूर झाल्याने अन्य १३ संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. या सर्व संशयितांवर फातोर्डा पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात एकूण ६२४ पानाचे आरोपपत्र दाखल केले असून, यात ८० साक्षीदारांची यादीही जोडण्यात आली आहे. या गँगवॉर प्रकरणात व्हॅली डिकॉस्ता, अमोघ नाईक व प्रकाश कारभार हे फातोर्डा पोलिसांना शरण आले होते. तर अन्य संशयितांना पोलिसांनी अटक केली होती.