

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
विद्यार्थिनीचा मासिक पाळीचा रक्तस्त्राव गणवेशावर उमटेपर्यंत शिक्षिकेने शिक्षा पूर्ण करण्याचे फर्मावल्या प्रकाराची विद्यार्थिनीच्या पालकांनी मंगळवारी शिक्षण खात्याच्या मडगाव विभागाच्या साहाय्यक संचालिका सिल्विया डिसोझा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. या प्रकाराची कसून चौकशी करून त्या शिक्षिकेच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मडगाव येथील एका नामांकित शाळेत घडलेल्या या प्रकाराची संपूर्ण माहिती पालकांनी तक्रारीत दिली आहे. त्या विद्यार्थिनीला शाळेत तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान झालेला छळ शाळेतील शिक्षिकांनी केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या शिक्षिकांनी सदर विद्यार्थिनीला दिलेल्या अमानुष वागणुकीमुळे तिचे मनोबल ढासळले असून, ती शाळेत जाण्यास घाबरत असल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आपल्या मुलीवर ओढवलेला हा प्रसंग अन्य कोणत्याही विद्यार्थिनीच्या बाबतीत घडू नये, यासाठी आपण ही तक्रार दाखल करत असल्याचे पालकांनी सांगितले.
सदर शाळेतील शिक्षिकांना विद्यार्थिनींशी कसे वागावे याचे साधे भान नसल्याने असले प्रकार घडत आहेत. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांसोबतच नागरिकांनी केली आहे.
तक्रारीची चौकशी करणार :
डिसोझा सदर विद्यार्थिनीच्या पालकांनी आपल्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. सध्या मी या विषयावर काहीही बोलू शकत नाही. या तक्रारीवर चौकशी केली जाणार असल्याचे शिक्षण खात्याच्या साहाय्यक संचालिका सिल्व्हिया डिसोझा यांनी सांगितले.