

मडगाव : विशाल नाईक
दक्षिण गोव्याच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी समीकरणे आकार घेऊ लागली आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने समविचारांची आघाडी केली होती.
या आघाडीमुळे दक्षिण गोव्यात भाजपविरोधी मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले आणि विरोधी पक्षांनी एकजुटीचे चित्र उभे केले. मात्र, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू होताच ही आघाडी टिकणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
काँग्रेसने गोवा फॉरवर्डसोबत जागावाटप किंवा आघाडीबाबत कोणतीही ठोस चर्चा न करता पक्षाला अधांतरी ठेवल्याची भावना गोवा फॉरवर्डमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदार विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोव्यात स्वतंत्र राजकीय ताकद उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
गोवा फॉरवर्डने आता 'एकला चलो रे' ची रणनीती स्वीकारत कुडचडे जिल्ह्यातील सांगे, केपे, सावर्डे आणि काणकोण या मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विजय सरदेसाई स्वतः ग्रामीण भागात दौरे करत असून गावागावांत कार्यकर्त्यांच्या बैठका, स्थानिक नेत्यांशी संवाद आणि संघटन विस्ताराचे काम सुरू झाले आहे.
काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी झालेल्या भागांमध्ये स्वतःचा पाया मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. या संपूर्ण रणनीतीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा मतदारसंघ ठरत आहे, तो म्हणजे सांगे मतदारसंघ. १९९४ मध्ये माजी मंत्री पांडू वासू नाईक यांच्या विजयामुळे सांगे मतदारसंघ अखेरचा काँग्रेसच्या ताब्यात होता. त्यानंतर स्व. प्रभाकर गावकर, वासुदेव मेंग गावकर आणि आता मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ भाजपचा अभेद्य बालेकिल्ला बनला. जवळपास तीन दशकांपासून काँग्रेसला येथे सत्ता मिळवता आलेली नाही.
तरीही सांगेमध्ये काँग्रेसची पारंपारिक मतपेटी आजही कायम असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. नेतृत्वाच्या कमतरतेमुळे ही मते सध्या संभ्रमात आहेत. काँग्रेसकडे प्रभावी स्थानिक नेतृत्व नसल्यामुळे या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, याच मतपेटीवर गोवा फॉरवर्ड दावा करण्याची तयारीत आहे. योग्य उमेदवार आणि प्रभावी संघटना उभी राहिल्यास ही पारंपारिक मतपेटी गोवा फॉरवर्डकडे वळू शकते, असे राजकीय तज्ज्ञ सांगतात.
सांगेमध्ये गोवा फॉरवर्डने नगरसेवक मेश्रू डिकॉस्टा यांच्या माध्यमातून रणनीती आखली आहे. डिकॉस्टा हे मंत्री सुभाष फळदेसाई यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे ते माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या माजी उमेदवार सावित्री कवळेकर यांच्या अत्यंत विश्वासातील कार्यकर्ते मानले जातात.
सावित्री कवळेकर यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवताना डिकॉस्टा यांच्या मदतीने सांगेमध्ये आपले नशीब आजमावले होते. मात्र दोन्ही वेळा त्यांना सुभाष फळदेसाई यांच्यासमोर पराभव स्वीकारावा लागला.
आता परिस्थिती बदललेली दिसत आहे. बाबू कवळेकर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, तर सावित्री कवळेकर सांगेच्या राजकारणातून काहीशा दूर आहेत. अशा वेळी मेश्रू डिकॉस्टा यांनी गोवा फॉरवर्डची साथ धरल्याची चर्चा असून, त्यांच्यामार्फत काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. त्यामुळे सांगेमध्ये भाजपविरोधी मतांचे नवे केंद्र म्हणून गोवा फॉरवर्ड उदयास येण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.
सावर्डे मतदारसंघातही गोवा फॉरवर्डने मोठी राजकीय खेळी सुरू केली आहे. धारबांदोडा तालुक्यातील या मतदारसंघात काँग्रेसला आजपर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. मतदारांनी मगोप, अपक्ष आणि भाजपला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली; मात्र काँग्रेसचे खाते अद्याप उघडलेले नाही. त्यामुळे काँग्रेस संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत असलेल्या या मतदारसंघात गोवा फॉरवर्डला मोठी संधी दिसत आहे.
सध्या सावर्डेत भाजपमध्येच उमेदवारीवरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. सभापती गणेश गावकर यांच्या विरोधात भाजपचे संकेत आर्सेकर यांनीही उमेदवारीवर दावा केल्याने पक्षात रस्सीखेच वाढली आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी गोवा फॉरवर्डने माजी मंत्री दीपक पाऊसकर यांना जवळ केले आहे.
दीपक पाऊसकर यांचा सावर्डे मतदारसंघात मजबूत जनसंपर्क आहे. त्यांचे बंधू आणि वहिनी सावर्डे पंचायतीवर कार्यरत होते, तर दीपक पाऊसकर स्वतः निरंकाल-दाभाळचे सरपंच राहिले आहेत. २०१७ मध्ये ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यानंतर भाजप सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम केले. मात्र, २०२२ मध्ये भाजपने त्यांना डावलून गणेश गावकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांचा पराभव झाला. आता गोवा फॉरवर्डकडून उमेदवारी मिळाल्यास सावर्डेत भाजप, गोवा फॉरवर्ड अशी दुरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.
काणकोण मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमीही गोवा फॉरवर्डच्या रणनीतीत महत्त्वाची मानली जात आहे. माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांच्या काळात हा मतदारसंघ काँग्रेसच्या प्रभावाखाली होता. त्यांच्या नंतर हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे गेला आणि रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने येथे मजबूत संघटना उभारली.
सलग विजयांमुळे काणकोण आज भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र स्थानिक प्रश्न, जमीन, पर्यावरण आणि एसटी आरक्षणाच्या मुद्द्यांवर निर्माण झालेल्या असंतोषाचा राजकीय फायदा घेण्याचा गोवा फॉरवर्ड प्रयत्न करत आहे. काणकोणमध्ये स्वतंत्र नेतृत्व उभे करून भाजपला थेट आव्हान देण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, काँग्रेसकडून आघाडीबाबत स्पष्ट भूमिका न आल्याने गोवा फॉरवर्डने दक्षिण गोव्यातील राजकारणात स्वतंत्र पर्याय उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगेतील काँग्रेसची पारंपारिक मतपेटी, सावर्ड्यात दीपक पाऊसकर यांचे नेतृत्व, काणकोणमधील भाजपचा बालेकिल्ला आणि केपेतील बदलती राजकीय परिस्थिती या चार सूत्रांवर विजय सरदेसाई यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याचे राजकारण नव्या वळणावर जाण्याची आणि भाजप, काँग्रेस तसेच गोवा फॉरवर्ड यांच्यात चुरशीची लढत रंगण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
केपे मतदारसंघातही एसटी आरक्षणामुळे नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डने स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि प्रभावी व्यक्तींशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे.