

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
सासष्टी तालुक्यातील सुरावली येथे बैलाची बेकायदा कत्तल केल्याचा प्रकार कोलवा पोलिसांनी उघडकीस आणला असून या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे ही घटना समोर आली आहे.
संशयिताच्या भारतीय न्याय संहिता तसेच गोवा प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ मे रोजी कोलवा पोलिस स्थानकाचे कर्मचारी नियमित गस्त घालत असताना सुरावली येथील जोसे यांच्या गोठ्याजवळ बेकायदा जनावरांची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर दोन व्यक्ती एका बैलाची कत्तल करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांची नावे दादापीर के. कलैगार (वय ३५) आणि महमद उम्मर तारीन (वय २०) अशी आहेत. दादापीर हा सुक्कोरभाट, साळसेत येथे वास्तव्यास असून मूळचा कर्नाटक राज्यातील आहे, तर महमद उम्मर तारीन हा फोंडा येथे राहत असून तोही मूळचा कर्नाटकचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारवाईदरम्यान पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळ पंचनामा करून संबंधित पुरावे आणि साहित्य जप्त केले.