Goa Theft Case | "पोलिसांवरच पाळत ठेवून करायचा चोरी!; म्हापसा चोरीप्रकरणातील संशयित मॅझीन डिकूझची धक्कादायक कबुली"

Goa Theft Case | म्हापसा येथील एका झेरॉक्स दुकानात चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मॅझीन डिकूझ (वय ३२, शिरोडा) याच्याकडून आणखी एका चोरीचा उलगडा करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे.
Goa Theft Case
Goa Theft Case
Published on
Updated on

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

म्हापसा येथील एका झेरॉक्स दुकानात चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मॅझीन डिकूझ (वय ३२, शिरोडा) याच्याकडून आणखी एका चोरीचा उलगडा करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे. आठ दिवसांपूर्वी आंगोड, म्हापसा येथील मोर्लेकर यांच्या दुकानात झालेल्या चोरीमागेही याचाच हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Goa Theft Case
Raigad Crime : आदराचा मुखवटा, ७६ वर्षांचे आजोबा अन् हातचलाखी

विशेष म्हणजे, बहुतांश चोर घर किंवा दुकानावर पाळत ठेवून चोरी करतात. मात्र, मॅझीनची पद्धत वेगळीच होती. तो रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असे. पोलिसांची गस्त पहाटे पाचच्या सुमारास संपल्यानंतर तो दुकाने फोडून चोरी करत असल्याची कबुली त्याने पोलिस चौकशीत दिली आहे.

दरम्यान, दीड वर्षांपूर्वी मडगाव येथे चोरी करताना तो पोलिसांच्या ताब्यात आला होता. मात्र, त्यावेळी एका नव्या पोलिस कर्मचाऱ्याच्या तावडीतून निसटून तो जंगलात पळून गेला होता. तेव्हापासून तो फरार होता. मडगाव, पणजी, फोंडा आणि कुडचडे पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. म्हापशात आणखी काही दुकाने फोडण्याचा त्याचा बेत होता. मात्र, स्थानिक गुप्तवार्ता शाखेच्या (एलआयबी) सतर्कतेमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

छत्रीने चेहरा लपवायचा, चोरीसाठी बसने प्रवास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅझीन लहानपणापासून मारामारी व चोरीच्या गुन्ह्यांकडे वळला होता. पालक नसल्याने तो एकटाच राहत होता. चोरीतून मिळालेल्या पैशावरच त्याचा उदरनिर्वाह चालत असे. त्याला दारू किंवा अन्य कोणतेही व्यसन नसल्याचे तपासात समोर आले आहे. तो सतत राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांसाठीही अवघड ठरत होते.

एलआयबीचे कॉन्स्टेबल संदेश आरोसकर यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील लाल रंगाचा टी-शर्ट आणि चालण्याच्या विशिष्ट शैलीवरून संशयिताची ओळख मॅझीन म्हणून निश्चित केली. त्यानंतर त्याच्यावर गुप्तपणे पाळत ठेवण्यात आली. सध्या तो गिरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. कदंब बसस्थानक परिसरात पोलिस गस्त असल्याने तो बसस्थानकाबाहेर झोपत असे आणि पहाटे चोरी करण्यासाठी बाहेर पडत असे. पहिल्या दिवशी तो पोलिसांच्या नजरेतून निसटला. मात्र, दुसऱ्या दिवशी कदंब बसस्थानकाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहात गेल्यानंतर पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

Goa Theft Case
Parbhani Crime : चार दुकाने फोडून हजारोंची रोकड लंपास; रात्रगस्त वाढविण्याची मागणी

त्याच्याकडून एक चाकू आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. चोरी करताना तो मोबाईलचा वापर टाळत असल्याचेही समोर आले आहे. मॅझीन चोरीसाठी बसने प्रवास करीत असे. गस्तीवरील पोलिसांची वेळ, मार्ग आणि हालचालींचा अभ्यास करून तो पहाटे पाचच्या सुमारास चोरी करत असे. दुकान फोडताना छत्री उघडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून चेहरा लपविण्याची युक्ती तो वापरत होता. चोरीनंतरही तो बसनेच निघून जात असल्याने त्याच्यावर सहज संशय येत नसे. पणजी पोलिस मुख्यालयाजवळील प्रकाश हॉटेलमध्ये झालेल्या चोरीतही आपलाच सहभाग असल्याची कबुली त्याने दिली आहे.

पोलिस निरीक्षक नवीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तप्रसाद पंडित, एलआयबीचे कॉन्स्टेबल संदेश आरोसकर, तुषार पालयेकर, महेंद्र मांद्रेकर आणि सुरेंद्र गावस यांनी ही कारवाई केली. या तपासात कॉन्स्टेबल संदेश आरोसकर यांची भूमिका विशेष मोलाची ठरली असून, पोलिस निरीक्षक नवीन देसाई यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news