Parbhani Crime : चार दुकाने फोडून हजारोंची रोकड लंपास; रात्रगस्त वाढविण्याची मागणी

घटनेमुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण
Bori theft case
चार दुकाने फोडून हजारोंची रोकड लंपासpudhari photo
Published on
Updated on

बोरी : येथे जिंतूर–परभणी मुख्य मार्गालगत तीन किराणा दुकाने आणि एका कृषी केंद्रावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करून तब्बल चार दुकाने फोडत ४० हजारांची रोकड लंपास केली. आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान बोरी पोलिसांसमोर उभे ठाकलेे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिंतूर–परभणी मुख्य रस्त्यालगतच स्वराज कृषी केंद्र, महादेव किराणा, भाग्यवंत किराणा आणि घोलप किराणा ही चार दुकाने मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केली. चोरट्यांनी प्रथम दुकानांचे कुलूप व शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. पहाटे दुकानदार दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर कुलूप तुटलेले व शटर उघडलेले दिसल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला.

Bori theft case
Sambhajinagar News : घरफोड्या अन् लुटमारीच्या घटनांनी नागरिक दहशतीत !

काही क्षणांतच शेजारील तीन दुकानेही फोडल्याचे स्पष्ट झाल्याने व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. कृषी केंद्राचे मालक गोपाळ माने यांनी बोरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी १० जुलै रोजी रात्री दुकान बंद करताना गल्ल्यात ५ हजार ठेवले होते. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर इतर दुकानदारांनाही चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

कृषी केंद्रातून ५ हजार, महादेव किराणा येथून ५ हजार, भाग्यवंत किराणा येथून १५ हजार आणि घोलप किराणा येथून १५ हजार, अशी एकूण ४० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. जिंतूर–परभणी मार्गावरील वर्दळीच्या परिसरात एकाच रात्री सलग चार दुकाने फोडली जात असताना सुरक्षा व्यवस्था नेमकी कुठे होती, असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त अधिक प्रभावी करण्यासह संशयितांवर नियमित नजर ठेवण्याची मागणी होत आहे.

बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावरील विद्युत पोलवर मागील दोन वर्षांपासून पथदिवे बसविण्यात आलेले नसल्याने रात्री मोठा अंधार असतो. याचाच फायदा चोरटे घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने पथदिवे सुरू करावेत, रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करावी अशी मागणी नागरिकांनी केली.

Bori theft case
Jalgaon robbery update | जळगाव जिल्ह्याला चोरट्यांचा विळखा; मुक्ताईनगर, पाचोरा अन् जळगावात लाखांचा डल्ला

सदरील चारही चोरी प्रकरणात गुन्‍हा नोंद झाला. लवकरच चोरट्यांचा शोध घेऊन त्‍यांना अटक केली जाईल, असे सपोनि रामेश्वर धोंडगे म्‍हणाले. घटनास्‍थळास सपोनि रामेश्वर धोंडगे, फौजदार महादेव गायकवाड, जमादार राजेश जटाळ, संघसेन कांबळे, प्रताप साळवणे, अमोल मुंडे, मोबीन शिवणकर यांनी भेट दिली.

पोलिस गस्‍तीवर व्‍यापाऱ्यांचे गंभीर प्रश्न

बोरीत मध्यरात्री सलग चार दुकाने फोडली जात असताना पोलिस व्हॅन नेमकी कुठे गस्त घालत होती? रोज रात्री गस्त घालणारा गोरखा त्यावेळी कोणत्या भागात होता? मुख्य रस्त्यालगत चोरीची घटना घडूनही पोलिसांना त्याची चाहूल कशी लागली नाही? असे अनेक प्रश्न व्यापारी व नागरिक उपस्थित करीत आहेत. रात्रीची गस्त अधिक परिणामकारक करण्याबरोबरच संशयितांवर कडक नजर ठेवून अशा घटनांची पुनरावृत्ती रोखावी, अशी मागणी व्यापारी संघटना व नागरिकांकडून होत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news