

The BJP alliance will win more than 35 out of 50 seats.
पणजी : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पंचायत निवडणुकीत ५० जागा पैकी ३५ पेक्षा जास्त जागा भाजप आणि युती पक्ष जिंकेल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी केला आहे. शुक्रवारी पणजी येथे भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हे दोन्ही नेते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की भाजपने ४० जागी उमेदवार उभे केले आहेत, मगोला ३ जागी आणि ७ ठिकाणी अपक्षांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. या पन्नास जागा पैकी ३५ पेक्षा जास्त जागा निश्श्चतपणे आम्ही जिंकू, किंवा त्याहीपेक्षा जास्त जागा मिळवून क्लीन स्वीप करु. आणि दोन्ही जिल्हा पंचायतीवर भाजपाचा झेंडा पुन्हा एकदा फडकवू. असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला.
काही ठिकाणी अटीतटीच्या लढती होत असल्या तरी तेथेही भाजप किंवा भाजप समर्थक उमेदवार निश्चितपणे बाजी मारतील. असेही ते म्हणाले. लोकांनी उद्या घरातून बाहेर पडावे व शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. जिल्हा पंचायत सदस्यांना जादा अधिकार देण्यासाठी ग्रामीन विकासाची कामे त्याचबरोबर सामुदायिक शेती व सामुदायिक डेरी कामे त्यांना देण्याबाबत सरकार विचार करेल.
त्याच बरोबर जिल्हा पंचायतीच्या आणि पंचायतीच्या कामांमध्ये संघर्ष होऊ नये यासाठी खास नियम तयार केले जातील. ग्रामसभांत जिल्हा पंचायत सदस्यांना योग्य ते स्थान मिळावे, यासाठी नियम दुरुस्ती करणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. राज्यात गुन्हे दरोडे पडत असले तरी त्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून गुन्हा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे डॉ. सावंत यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नविन यांची नियुक्ती झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याच बरोबर गोवा मुक्ती दिनाच्या गोमंतकीयांना शुभेच्छाही दिल्या.
लोकांचा चांगला प्रतिसाद : दामू
दामू नाईक यांनी सांगितले की, आपण सापण मुख्यमंत्री व इतर नेत्यांनी मिळून राज्यभरात २९३ लहान मोठ्या बैठका व सभा घेतल्या. त्यात स्वयंपूर्ण गोवाचे काम लोकांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. भाजप विकासावर निवडणूक लढवत आहे, असे सांगून पक्षनिष्ठा आणि सक्रिय कार्यकर्त्यांना भाजपने उमेदवारी दिल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.