

Curly's Shack finally sealed
हणजूण : हणजूण येथील प्रसिद्ध कर्लीस रॉकला अखेर किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीआरझेड) सील ठोकले. ही कारवाई दि. १९ डिसेंबर रोजी बार्देश मामलेदारचे प्रतिनिधी म्हणून सर्कल इन्स्पेक्टर परवेश फडते, हणजूणचे तलाठी मुन्नेश गावकर, सीआरझेडचे अधिकारी, वीज खात्याचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी हणजूणचे उपनिरीक्षक साहिल वारंग व इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
टिक टॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रकाश झोतात आलेल्या या कर्लीस बारचे बांधकाम राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ९ सप्टेंबर २०२२ मध्ये तोडून टाकण्यात आले होते. सागरी नियमन कायद्यांचे उल्लंघन करून बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याची तक्रार एका आरटीआय कार्यकत्यनि केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
यावेळी या शॅकच्या सर्वे क्रमांक ४२/१० मधील जागेतील बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवण्यात आली होती. आता हडफडे येथील बर्च वाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये झालेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी किनारी विभागातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचित केले होते.
त्यानुसार या भागातील काही नाईट क्लब सील करण्यात आले असून त्याचाच भाग म्हणून किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम केल्याप्रकरणी हा रॉक सील केला आहे.