

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्यात एलपीजी गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक तसेच हातगाडे व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेषतः मडगाव शहरातील रोस-ऑम्लेट आणि वडापाव विक्रीच्या व्यवसायावर या टंचाईचे मोठे संकट ओढवले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सिलिंडर टंचाईचा विषय चर्चेत आहे. सरकारकडे घरगुती सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री सांगत असले, तरी टंचाईबाबत पसरलेल्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर सिलिंडर खरेदीसाठी धाव घेत आहेत.
परिणामी गॅस एजन्सींवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून नागरिक तासन्तास रांगेत उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. सिलिंडर टंचाईच्या चर्चेमुळे लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दक्षिण गोव्यातील मडगाव, फातोर्डा, कुडचडे आणि फोंडा परिसरात मोठ्या प्रमाणावर रोस-ऑम्लेट-पाव विक्रीचे गाडे आहेत. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र या हातगाडे व्यवसायिकांना व्यावसायिक वापरासाठी लागणारा गॅस सिलिंडर वेळेत मिळेल की नाही, याची भीती सतावत आहे.
मडगावसह दक्षिण गोव्यातील विविध गॅस एजन्सींसमोर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिक पहाटेपासूनच एजन्सीसमोर हजेरी लावत आहेत.
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण तासन्तास रांगेत उभे राहत असल्याने नागरिकांचा मोठा त्रास होत आहे. मडगाव शहरातील ऑम्लेट-पाव गाडेवाल्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवीण नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक व्यावसायिकांकडे दोन-दोन व्यावसायिक सिलिंडर असले तरी अशी परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना नसल्याने त्यांनी वेळेत सिलिंडर भरून घेतले नव्हते.
सिलिंडरशिवाय व्यवसाय करणे अशक्य आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास व्यवसाय बंद करावा लागेल.
- गौतम नाईक, व्यावसायिक