

पुणे ः राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधील (एनसीएल) अकरा विद्यार्थ्यांनी मिथेनॉलपासून डायमिथील इथर (डीएमई) हा एलपीजीला आता अस्सल देशी गॅसचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी दावा केला आहे की, ‘डीएमई’चा 14 किलोंचा सिलिंडर 675 रुपयांत देऊ शकतो आणि तो एलपीजीपेक्षा 10 ते 15 टक्क्यांनी स्वस्त आहे. भविष्यात त्याहीपेक्षा कमी किंमत कमी होऊ शकते.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही भारत सरकारची संस्था असून, ती पुण्यातील बाणेर भागात आहे. या ठिकाणी विद्यार्थी रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी भारताच्या विविध राज्यांतून येतात. 2018 मध्ये येथील 11 विद्यार्थ्यांनी मिथेनॉलपासून ‘डीएमई’ (डायमिथील इथर) हा ज्वलनशील गॅस प्रयोगशाळेत तयार केला. तो स्वयंपाकाच्या गॅसला पर्याय ठरू शकतो. बाहेरच्या कोणत्याही देशातून एलपीजी आयात करण्याऐवजी आपणच आपल्या देशात स्वदेशी गॅस तयार करू शकतो, ही कल्पना मांडली. त्यासाठी ‘डीएमई’ नावाचा छोटासा कारखानाच त्यांनी प्रयोगासाठी संस्थेत उभा केला अन् ‘डीएमई’ गॅसचे यशस्वी उत्पादन करून दाखवले.
...या विद्यार्थ्यांनी केला प्रयोग यशस्वी
आकाश भटकर (पीएच.डी. विद्यार्थी, पुणे) हे टीम लीडर असून, शीतल गवळी (तुळजापूर), समृद्धी माने (अहिल्यानगर), मणिकंदन (तामिळनाडू), प्रवीण (तामिळनाडू), पेरिस्वामी (तामिळनाडू), अश्विनी (केरळ), नाझरीन (केरळ), आदिती कांबळे (मुंबई), आकाश यादव (उत्तर प्रदेश), शिवप्रसाद (हैदराबाद) या विद्यार्थ्यांनी अहोरात्र झटून हे संशोधन केले. त्यांना ‘एनसीएल’च्या कॅटालिस्ट विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टी. राजा आणि संचालक डॉ. आशिष लेले यांनी मार्गदर्शन केले आहे.
बहुगुणी बहुरूपी ‘डीएमई’
विद्यार्थ्यांनी गॅसची चूल मांडून तीन किलोंचा 100 टक्के ‘डीएमई’ने भरलेल्या सिलिंडरवर ज्वलन करून दाखवले. त्याची फ्लेम निळ्या रंगाची असून, त्याचा वास फळांसारखा सुगंधी आहे. जीवाश्म इंधन न वापरता घनकचऱ्यापासून मिथेनॉल तयार करता येतो. ‘डीएमई’चा वापर इंधन म्हणून वाहनात होतो. मिथेनॉलवर चालणारे छोटे स्टोव्ह तयार केले असून, ते हॉटेल्स, रेस्टॉरंटस्साठी कामाला येऊ शकतात.
सरकारसाठी दोन पर्याय उपलब्ध
आकाश भटकर यांनी सांगतिले की, सरकारसाठी आमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे, आहे त्या पारंपरिक एलपीजीमध्ये 8 ते 20 टक्क्यांपर्यंत ‘डीएमई’ मिसळणे शक्य आहे. यात घरातील गॅसच्या बर्नर, नोजल आणि सिलिंडरमध्ये काही बदल करण्याची गरज नाही. दुसरा पर्याय असा आहे की, 100 टक्के ‘डीएमई’चा सिलिंडर तयार करणे शक्य आहे. त्यासाठी मात्र गॅस शेगडीच्या बर्नरमध्ये काही किरकोळ बदल करावे लागतील.