

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजीत सुरू होणाऱ्या सेरेंडीपिटी आर्ट फेस्टिव्हलमधील एका कार्यक्रमासाठी कला अकादमी परिसरात उभारलेल्या सभागृहाला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. तिथे सुरू असलेल्या वेल्डिंग कामामुळे ही आग लागल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एक वर्षापूर्वी म्हणजे ८ डिसेंबरला याच कार्यक्रमाच्या आयनॉक्स परिसरातील थिएटरला आग लागल्याची घटना समोर आली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कला अकादमी येथे सेरेंडीपिटी आर्ट फेस्टिव्हलमधील सभागृहाला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला पावणे पाचच्या सुमारास मिळाली. मात्र अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वीच तेथील सुरक्षा रक्षकांनी अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने ही आग विझवली. कामगार काही फुटाच्या उंचीवर वेल्डिंग करत होते, जिथे वरच्या बाजूस पॉलिथिन असल्याने वेल्डिंगची ठिणगी पेटल्याने पॉलिथिनने पेट घेतला आणि सभागृहाचा काही भाग जळाला.. मात्र तिथे उपस्थित असलेल्या कामगार आणि सुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानाने आग विझवण्यात त्यांना यश आले.
सुरक्षा प्रोटोकॉलची खबरदारी न घेतल्यानेच घटना
मागील वर्षी आयनॉक्स परिसरात महोत्सवासाठी तात्पुरते सभागृह उभारणीवेळी वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागली. आग लागल्याचे कळताच आयनॉक्स सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित आग विझवण्यास सुरुवात केली. कंत्राटदारांनी कोणत्याच सुरक्षा प्रोटोकॉलची खबरदारी न घेतल्यानेच ही आग लागल्याचे निदर्शनास आले होते. थिएटरच्या चारही बाजूंनी कापडाचे आवरण असल्याने केवळ १० ते १५ मिनिटात सर्व सभागृह जळून खाक झाले होते.