Goa Restaurant Bar Guidelines | हडफडे दुर्घटनेनंतर गोव्यात सर्व नाईट क्लब–बारसाठी एसडीएमएचे कडक निर्देश
पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथे घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्यातील सर्व नाईट क्लब, रेस्टॉरंट, बार, इव्हेंट व्हेन्यू आणि अशा प्रकारच्या आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
सर्व आस्थापनांना पुढे निर्देश दिले जात आहेत की ७ दिवसांच्या आत अंतर्गत सुरक्षा ऑडिट करावे आणि त्याचा अहवाल जिल्हा प्रशासन, अग्निशमन सेवा किंवा अधिकृत संघांच्या तपासणीसाठी तयार ठेवावा. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई होणार असून, त्यात आस्थापने बंद करणे, परवाना निलंबित किंवा रद्द करणे आणि तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करणे यांचा समावेश असेल.
हा सल्ला राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जारी करण्यात आला असून तत्काळ प्रभावाने लागू होईल. सर्व आस्थापनांना खालील अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा, आपत्कालीन तयारी आणि संरचनात्मक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करतील. यात खालील बाबींचा समावेश असेल; परंतु त्यापुरतेच मर्यादित नसेल :
१. वैध अग्निशमन परवाने मिळवणे व अग्निशमन विभागाने घालून दिलेल्या अटींचे पालन करणे. २. अधिकृत क्षमतेनुसारच ग्राहकांना प्रवेश देणे; जास्त गर्दी होऊ न देणे आणि क्षमतेची माहिती स्पष्टपणे प्रदर्शित करणे.
३. धूर/उष्णता संवेदक, अलार्म, स्प्रिंकलर, हायड्रंट, होज रील आणि अग्निशमन यंत्रे कार्यरत स्थितीत ठेवणे.
४. प्रमाणित विद्युत साहित्य व संरक्षक उपकरणे वापरणे, तात्पुरते ओव्हरलोडेड किंवा धोकादायक विद्युत कनेक्शन काढून टाकणे.
५. सर्व आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग व रस्ते मोकळे ठेवणे, प्रकाशमान साइनेज. नकाशे व आपत्कालीन दिवे सुनिश्चित करणे.
६. कर्मचारी वर्गाला नियमित प्रशिक्षण देणे, प्रत्येक शिफ्टसाठी अग्निसुरक्षा अधिकारी नेमणे व ठराविक कालावधीत आपत्कालीन बचाव सराव करणे.
७. कर्मचारी प्रशिक्षणात सुचवलेल्या पलायन उपायांचा समावेश करावा (उदा., जर अडकले असतील आणि सुरक्षितपणे बाहेर पडणे शक्य नसल्यास, बेडशीट एकमेकांना बांधून उंची व्यवस्थापनीय असल्यास तात्पुरती दोरी/शिडी तयार करावी).

