

पणजी : प्रभाकर धुरी
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लब अँड रेस्टॉरंट. शनिवार, मध्यरात्रीची वेळ, क्लबमध्ये अचानक आग लागली. क्षणात आगीची भीषणता वाढली. आतील भागात कामगार आणि पर्यटक अडकले. त्यांना वाचवण्यासाठी सगळ्यांची धावाधाव सुरू झाली.
आग लागल्याची माहिती क्लबचा कर्मचारी सुब्रा याने रात्री ११.४५ वा. म्हापसा अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन बंब आले, रुग्णवाहिका आल्या, पोलिस व्हॅन आल्या, मंत्री आले, त्यांच्यासोबत गाड्यांचा ताफा आला. या सगळ्या गाड्यांच्या सायरनचा आवाज आसमंतात घुमला. ज्या क्लबमधून संगीताचे सूर यायचे, त्या क्लब परिसरातून सायरनचा आवाज येत होता.
ज्या स्थानिक लोकांनी हे सगळे दृश्य पाहिले, अनुभवले त्यांनी म्हटले की, त्या रात्री क्लब परिसरात संगीताच्या जागी फक्त सायरन वाजत होता. शनिवार, दि. ६ डिसेंबरची रात्र. वीकेंड मजेत घालवण्यासाठी देश विदेशातील पर्यटक गोव्यात येतात. असेच पर्यटक हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या किनारपट्टी भागातील नाईट क्लब अँड रेस्टॉरंटमध्ये आले होते. या क्लबमध्ये पर्यटकांसाठी संगीत रजनीचा कार्यक्रम असतो. प्रसिद्ध नर्तिका या ठिकाणी नृत्य करतात.
शनिवारी रात्रीही नृत्यांगना क्रिस्टीना शेख नृत्य करत होती. तिचा हा त्या दिवसातील दुसरा परफॉर्मन्स होता. अचानक स्टेजच्या वरच्या भागात शॉर्ट सर्किट झाले आणि काही क्षणात आगीचा भडका उडाला. क्लबमध्ये नृत्याचा कार्यक्रम वर होता, तर खालच्या भागात (तळघरात) स्वयंपाकघर होते. पडलेल्या शॉर्टसर्किटमुळे ठिणगीने रौद्र रूप धारण केले. आगीचा भडका उडाला. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट पसरले. सगळीकडे गोंधळ उडाला. किचनमध्ये धूर एकच दरवाजा, तोही अरुंद त्यातून बाहेर पडायचे, तर आगीचे लोळ समोर, यामुळे कर्मचारी आणि पर्यटक किचन आणि क्लबच्या इतर भागात अडकले.
यात दोघी सख्ख्या बहिणी होत्या. त्या वीकेंडसाठी इतरांसोबत गोव्यात आल्या होत्या. आग सगळीकडे पसरली, क्लबमधील वस्तू पेटू लागल्या आणि प्रत्येकाची जगण्यासाठी धडपड सुरू झाली. तळमजला आणि तळघरात धूर पसरला आणि काहींचा जळून तर काहींचा गुदमरुन मृत्यू झाला. एकूण २५ जणांचे बळी या आगीने घेतले. यातील २१ जण क्लबमधील कामगार होते. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले, तर २० जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
क्लबच्या आतील भागात कर्मचारी व पर्यटक यांच्यावर काय प्रसंग ओढवला असेल, या कल्पनेने अनेकांचे पाय लटपटत होते. अनेकजण निःशब्द झाले होते. याचवेळी आत अडकलेले सर्वजण जगण्यासाठी धडपडत असतील. गुदमरल्याने ते तडफडले असतील. मृत्यूच्या भयाने आणि जगण्याच्या आशेने आत अडकलेले सर्वजण आक्रोश करत असतील आणि हा आक्रोश ऐकून स्वयंपाकघराच्या भिंतीही गहिवरल्या असतील.