

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
येत्या तीन दिवसांमध्ये कोळसा दुर्गंधी बंद न झाल्यास, नागरिक थेट कंपनीचे गेट फोडून कार्यालयावर चाल करून जातील, असा इशारा आमदार संकल्प आमोणकर यांनी बुधवारी दिला. कोळसा प्रदूषण कमी व्हावे ही आमची मागणी असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. गेली पंधरा वर्षे मुरगावचा आमदारपद भूषविलेले व माजी मंत्री असलेल्या राजकारण्याचे नाव न घेता 'झोपी गेलेला जागा झाला', अशी टीका आमदार आमोणकर यांनी केली.
कोळसा प्रदूषण व दुर्गंधीमुळे हैराण झालेल्या सडा, बोगदा, जेटी व परिसरातील रहिवाशांनी बुधवारी सकाळी सडा चौकातून भव्य रॅली काढली. या रॅलीमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. रॅली जेटी, लोअर जेटीमार्गावर आली. तेथे वक्त्त्यांची भाषणे झाली. या भाषणात वक्त्त्यांनी आम्हाला कोळसा प्रक्षण बंद करा, यावर जोर दिला.
त्यानंतर रॅलीतील नागरिक घोषणा देत अदानी कंपनीच्या गेटसमोर आले. यावेळी अदानी कंपनीचे अधिकारी गेट बाहेर येऊन निवेदन घेण्यास विलंब करीत असल्याने रॅलीतील काहीजणांनी गेटसमोर धाव घेतली. त्यामुळे तेथे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, आमदार आमोणकर यांनी शांतता बाळगण्याचे आवाहन करून संबंधितांना मागे हटण्यास सांगितले. त्यानंतर अदानी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भूषण यांनी गेटबाहेर येऊन निवेदन स्वीकारले.
उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेवक दीपक नाईक, रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, प्रसाद प्रभुगावकर, उमेश मांद्रेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक, सांतान, मुरगाव प्रभारी संतोष केरकर, मुरगाव भाजपा मंडळ अध्यक्ष अविनाश नाईक, मुरगावचे उपजिल्हाधिकारी करमळी, पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, निरीक्षक सेरिफ जॅकीस उपस्थित होते.
कोळसा प्रदूषण प्रकरणी कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन आमोणकर यांनी केले. आमदार नव्हतो तेव्हाही आपण कोळसा प्रदूषण नियंत्रणात असले पाहिजे अशी मागणी केली होती. आता कोळसा प्रदूषण नको संबंधी आपण सतत विधानसभा अधिवेशनात तसेच बाहेर सातत्याने आवाज केला आहे. प्रदूषण कमी झालेच पाहिजे. मी कोणासमोर वाकणार नाही. फक्त जनता जनार्दनसमोर मी वाकतो. ते माझे देव आहेत असे त्यांनी स्ष्ट केले. कोळसा हाताळणी बंद करा असे मी कधीच म्हटले नाही.
हाताळणीमुळे होणारे प्रदूषण व दुर्गंधी बंद व्हावी, मी मुरगाव बंदरात माझा कोणताही व्यवसाय नाही. कोणी सिद्द केल्यास मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. झोपी गेलेले आता जागे झाले आहेत. त्यांनीही कोळसा प्रदूषण कमी झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. त्या मागणीचा त्या राजकारणीला विसर पडला असून, आता तो कोळसा नको अशी मागणी करतो असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसाद प्रभूगावकर यांनीही दुर्गंधीमुळे रात्री नऊ वाजता लोक दारेखिडक्या बंद करतात. कोळसा प्रकरणी राजकारण करू नये. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोळसा प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली. नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी प्रदूषण बंद करण्यासाठी मुरगाव वास्को, दाबोळीच्या तीनही आमदारांनी तसेच पालिकेच्या २५ही नगरसेवकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले.
जयंत जाधव यांनी कोळसा हाताळणी बंद केल्यास मुरगाव बंदर प्राधीकरणाच्या ४ हजार निवृत्त कामारांना पेन्शन तसेच १२०० कामगारांना वेतन कोठून देणार असा प्रश्न उपस्थित केला. याकारणास्तव आम्ही कोळसा प्रदूषण नियंत्रणात आणण्याची मागणी करीत असल्याचे सांगितले.
नगरसेवक दीपक नाईक यांनी आपण नगराध्यक्ष असताना २०१५मध्ये कोळसा हाताळणी बंदसंबंधी मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत ठराव घेतला होता. असे सांगितले. या कंपन्यांकडून सीएसआरअंतर्गत कोणतीही कामे करून घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले. सर्वानी भेदभाव विसरून पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : डॉ. प्रभुदेसाई डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई यांनी मुरगावच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. दुर्गंधी, वायुप्रदूषणामुळे अॅलर्जी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुढच्या पिढीचा विचार करण्याची गरज आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.
डॉ. प्रभुदेसाई डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई