नाटकातून समाजभान जपणाऱ्या संपदा गावस

नाटकातून समाजभान जपणाऱ्या संपदा गावस
संपदा गावस
संपदा गावस
Published on
Updated on

Sampada Gawas Social Awareness Through Theatre

रंगयात्रा - निवृत्ती शिरोडकर

गोमंतकीय रंगभूमीला अनेक दिग्गज कलाकारांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत आपल्या कौटुंबीक जबाबदाऱ्या, नोकरीतील कर्तव्यनिष्ठा आणि समाजातील मान यांची सांगड घालत रंगभूमीची अखंड सेवा करणाऱ्या महिला कलाकारांचाही मोलाचा वाटा आहे. अशाच जिही, कर्तृत्ववान आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आणि नाटकातून समाजभान जपणारी अभिनेत्री म्हणजे केरी-सत्तरी येथील संपदा गोपाळ गावस होय.

१२ नोव्हेंबर २००० रोजी जन्मलेल्या संपदा गावस यांनी लहान वयातच कलाक्षेत्रात पदार्पण केले. आजची स्त्री केवळ गृहकृत्यदक्ष न राहता संस्कृती, परंपरा आणि कलेची जपणूक करणारी समर्थ व्यक्ती म्हणून पुढे येत आहे; याचे जिवंत उदाहरण म्हणजे संपदा गावस. अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या त्रिवेणी संगमातून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची ठळक छाप उमटवली आहे.

संपदा गावस
Goa | कुडचडेच्या राजकारणात नवा रंग

घरातील जबाबदाऱ्या, नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधत त्यांनी कलेची ज्योत अखंड तेवत ठेवली आहे. गावागावातील हौशी नाट्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत त्यांनी केवळ स्वतःची ओळख निर्माण केली नाही, तर अनेक नवोदित कलाकारांना प्रोत्साहन व मार्गदर्शनही दिले आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

संपदा रंगभूमीवर उभी राहतात तेव्हा त्या केवळ भूमिका साकारत नाहीत, तर समाजातील स्त्रियांच्या भावना, संघर्ष आणि आशा-आकांक्षा यांना अभिव्यक्ती देते. संपदा गावस यांच्या अभिनयातूनही हा सकारात्मक सामाजिक संदेश प्रकर्षाने जाणवतो.

संपदा गावस यांनी आजवर साडेतीनशेहून अधिक नाट्यप्रयोग सादर करत रंगभूमीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संत गोरा कुंभार, मत्स्यगंधा, संशयकल्लोळ, रायगडाला जेव्हा जाग येते, रणधुंभी, रणझुंजार, जय श्रीराम, भाऊबंदकी, संगीत मुक्ताई, आकाश मिठी, चक्रव्यूह, मायेची सावली, अशा गाजलेल्या नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत.

संपदा गावस
Goa Parvari traffic jam- पर्वरीत वाहतुकीची जीवघेणी कोंड

त्यांच्या अभिनयाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भाऊबंदकी या नाटकातील भूमिकेसाठी विशेष पुरस्कार, तर मत्स्यगंधा मधील भूमिकेसाठी २०२१ मध्ये उत्कृष्ट अभिनयाचा बहुमान मिळाला. रणधुंभी या नाटकात पुरुष भूमिका साकारून त्यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकही पटकावले. २०२५ मध्ये दोन माड बाजार समिती तसेच सम्राट क्लबतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कलाकाराचे आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी व्यापलेले असते. संशयकल्लोळ नाटकाच्या काळात त्यांचा अपघात झाला होता; मात्र या संकटालाही न जुमानता त्यांनी रंगभूमीवरील आपली जबाबदारी निभावली. २०२१ मध्ये सलाईन सुरू असतानाही नाटकाचा प्रयोग सादर करून त्यांनी कलेप्रती असलेले आपले अपार समर्पण सिद्ध केले. अभिनयासोबत गायन आणि दिग्दर्शनातही ठसा संपदा यांनी अभिनयाबरोबरच गायन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आठवीत असताना त्यांनी भजन गायनाची सुरुवात केली.

नियती गावस यांचे प्रोत्साहन, तसेच विठ्ठल गावस, जीवन नाईक आणि शैलेश शिरोडकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. भजन, अभंग, गवळण गायन स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून कला अकादमीच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

फोक डान्स, फुगडी, दिंडी, मुरुळ अशा लोककलांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी आपली छाप उमटवली असून कृष्णलीला महानाट्य या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. सध्या त्या आर्ट व कला शिक्षिका म्हणून कार्यरत असून नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देत आहेत. संपदा गावस यांच्या यशामागे त्यांच्या आई राथा गोपाळ गावस यांचा मोलाचा वाटा आहे. आईच्या सततच्या पाठिंब्यामुळेच आपण या क्षेत्रात टिकून राहिले आहे, असे त्या नम्रपणे सांगतात.

नव्या पिढीसाठी प्रेरणादायी संदेश

नवोदित कलाकारांनी केवळ आकर्षण म्हणून नव्हे, तर योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात यावे, असा त्यांचा सल्ला आहे. सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करून कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येते, असे त्या सांगतात. गावागावातील हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अधिक प्रभावी योजना राबवाव्यात, अशी अपेक्षाही त्या व्यक्त करतात.

नव्या पिढीसाठी प्रेरणादायी संदेश

नवोदित कलाकारांनी केवळ आकर्षण म्हणून नव्हे, तर योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात यावे, असा त्यांचा सल्ला आहे. सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करून कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येते, असे त्या सांगतात. गावागावातील हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अधिक प्रभावी योजना राबवाव्यात, अशी अपेक्षाही त्या व्यक्त करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news