

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मोरजी आणि हरमल भागात दोन रशियन महिलांची निघृण हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आलेक्सी लिओनोव्ह याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे केवळ खून नसून त्यामागे प्रेमसंबंध, अविश्वास आणि पैशांचा हव्यास असल्याचे उघड झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हरमल येथील बामणभाटी भागात एका भाड्याच्या खोलीत ३७ वर्षीय एलिना या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. त्याच दिवशी मोरजी येथील मधलावाडा येथे दुसऱ्या एका रशियन महिलेची बाथरूममध्ये हत्या झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी तातडीने तपास करत संशयित आलेक्सीला तातडीने बेड्या ठोकल्या.
हा संशयित आलेक्सी सुरुवातीला रशियन महिलांशी मैत्री करून त्यांचे प्रेम संपादन करायचा. एकदा का महिलांचा विश्वास बसला की, तो त्यांच्याकडून मोठ्या रकमांची मागणी करत असे. जर महिलांनी पैसे देण्यास नकार दिला किंवा तिचे दुसऱ्या कोणाशी संबंध असल्याचा संशय आला, तर तो विश्वासाने तिला जवळ घेऊन तिची निघृण हत्या करायचा, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
हिमाचल पोलिसांशी संपर्क
या प्रकरणाबाबत बाहेर काही वाच्यता करू नये, असे निर्देश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मांद्रे पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. संशयिताने दिलेल्या पहिल्या जबाबानुसार हे प्रकरण हायफ्रोफाईल होऊ शकते. त्यामुळे पोलिस सर्व प्रकारच्या शक्यता तपासात आहेत. गेले दोन दिवस पोलिसांनी या प्रकरणी अंतर्गत स्तरावर वेगाने तपास सुरू ठेवला आहे. हिमाचल प्रदेशमधील पोलिसांशीही गोवा पोलिस चर्चा करत आहेत.
संशयिताकडून आणखी हत्या शक्य...
पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक म्हणाले, संशयिताच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा खोलवर तपास सुरू आहे. हा रशियन पर्यटक नेमका सायको किलर आहे का? त्याने गोव्यात आणखी कोणाचे बळी घेतले आहेत का, या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुराव्यांची साखळी जोडत आहोत. मात्र तपासादरम्यान त्याने पोलिसांनाही चक्रावून सोडले आहे. तो वारंवार आपली जबानी बदलत असून, त्याने सध्या दोन खून केल्याचे कबूल केले असले तरी आणखी काही हत्या केल्या असण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.