

पणजीः पुढारी वृत्तसेवा
राज्यामध्ये व सरकारने स्टार्टअप धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे उद्योजक तयार व्हावेत यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. पुरुषच नव्हे तर महिलाही मोठ्या प्रमाणात स्टार्टअपमध्ये सहभागी झाल्या असून स्टार्टअपमध्ये ३३ टक्के महिलांनी सहभाग नोंदवला आहे.
ग्रामीण महिलांना प्रशिक्षण देणारी महिला डिजिटल सशक्तीकरण योजना यशस्वी होत आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री व माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंबटे यांनी दिली. शुक्रवारी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री खंवटे बोलत होते.
रेजिनाल्ड यांनी क्रिएटिव्ह नॉलेजचा प्रसार करण्याची मागणी केली, तर आमदार वरेिश बोरकर यांनी ए आयचा सामना करण्यासाठी नवे कोर्स सुरू करा, सेंटर ऑफ एक्सीलेन्सची संख्या वाढवा अशा सूचना केल्या. युरी आलेमाव यांनी एआयचा सामना करण्यासाठी सशक्त धोरण हवे, अशी सूचना केली.
त्याला उत्तर देताना खंवटे बोलत होते. गोवा क्रिएटिव्ह नॉलेज हब आणि क्रिएटिव्हिटी डेस्टीनेशन करण्यासाठी हरघर फायबर चा उपक्रम राबवण्यात आला आहे. येत्या काळामध्ये विविध करानंतर जेथे घर आहे तेथे रेंज उपलब्ध होणार आहे.
डिजिटल एज्युकेशन वर भर दिला जात असून एआयचा वापर वाढला तरी जास्तीत जास्त रोजगारांचे संरक्षण कसे होईल, यावर सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे ते म्हणाले. ड्रोन टॅक्सीचा प्रोमो तयार होत आहे. त्याचबरोबर एंटी ड्रोन फॅक्टरी ही गोव्यामध्ये येणार आहे. त्याचे करार झाले आहेत. २०२७ पर्यंत तुये आयटी सीटी पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असे खंवटे यांनी सांगितले
तीस वर्षांनंतर रोबोट आमदार
सध्याच्या काळामध्ये एआयचा प्रसार पाहता येत्या तीस वर्षांमध्ये रोबोट आमदार विधानसभेमध्ये बसतील आणि लोकही त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना मते देतील, असे मत आमदार नीलेश काब्राल यांनी आयटी व आयएच्या विषयावरील लक्षवेधी सूचनेत भाग घेताना व्यक्त केले. पुढील पंधरा वर्षांचा विचार करून सरकारने याबाबातचे धोरण ठरवावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
आयटी, उद्योग नको, नोकऱ्या कशा मिळणार?
गोव्यातील अनेकजण हे आयटीमध्ये गोव्यात नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून ओरड मारतात. मात्र ज्यावेळी आयटी उद्योग स्थापन व्हावेत, यासाठी सरकार प्रयत्न करते त्यावेळी त्याना विरोध करणाऱ्यांना तेच लोक साथ देतात. गोवेकरांनी ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे आयटी मंत्री रोहन खंवटे म्हणाले.
राज्याला स्टार्टअप पुरस्कार
गोवा सरकारच्या आयटी खात्याला राष्ट्रीय इकोसिस्टीम साठी स्टार्ट अप पुरस्कार प्राप्त झाला आहे. आजच हा परस्कार घोषीत झाल्याची माहिती आयटी खात्याचे मंत्री खंवटे यांनी विधानसभेमध्ये दिली.