

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्याच्या तुलनेत अवघ्या चार ते पाच दिवसांत सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर १३,१३४ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १४,१९० रुपये प्रति ग्रॅम इतका झाला आहे. याआधीच्या आठवड्यात सोन्याचे दर तुलनेने कमी होते. मात्र अचानक झालेल्या या वाढीमुळे बाजारभावात मोठा फरक जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढउतार तसेच गुंतवणूकदारांचा सोने खरेदीतील वाढता कलामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. या दरवाढीचा थेट परिणाम गोव्यातील सोन्याच्या बाजारावर दिसून येत असून, ग्राहक खरेदी करताना सध्या सावध भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दागिन्यांची खरेदी अपेक्षित असते. मात्र वाढलेल्या दरांमुळे अनेक ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलली आहे. काही ग्राहक हलक्या वजनाचे दागिने खरेदी करण्याकडे वळले आहेत. काहीजण केवळ गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याची नाणी किंवा बिस्किटे घेण्यास प्राधान्य देत आहेत. सुवर्ण व्यापाऱ्यांच्या मते, दर स्थिर होईपर्यंत खरेदीचा वेग मंद राहण्याची शक्यता आहे. मात्र सोन्यातील गुंतवणूक दीर्घकालीनदृष्ट्या सुरक्षित मानली जात असल्याने, पुढील काळात पुन्हा खरेदीत वाढ होईल.