

पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत सुमारे ११.०१ कोटी किमतीच्या स्थावर मालमत्तेची तात्पुरती जप्ती केली आहे. ही कारवाई मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदांतर्गत करण्यात आली असून, या प्रकरणातील एकूण जप्त/गोठवण्यात आलेली मालमत्ता आता २९.०५ कोटींवर पोहोचली आहे.
ईडीने केलेल्या तपासात, हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' हे नाईट क्लब अनिवार्य वैधानिक मंजुरींशिवाय चालवले जात असल्याचे उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषतः, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही क्लब सुरू ठेवण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. तसेच, आरोग्य विभागाची बनावट एनओसी आणि बनावट पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र सादर करून नाईट क्लब कायदेशीर असल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे.
ईडीचा तपास हणजूण आणि म्हापसा पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरच्या आधारे सुरू करण्यात आला. या एफआयआरमध्ये डिसेंबर २०२५ मध्ये घडलेल्या भीषण आगीच्या घटनेबरोबरच बनावट कागदपत्रे वापरून परवानग्या मिळवल्याचे गंभीर आरोप समाविष्ट आहेत. त्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.
तपासादरम्यान, संबंधित प्रतिष्ठान मार्च ३१, २०२४ रोजी ट्रेड लायसन्स संपुष्टात आल्यानंतरही सुरू ठेवण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून ६ डिसेंबर २०२५ पर्यंत सुमारे २९.७८ कोटींचे उत्पन्न या नाईट क्लब ने मिळवले असून, ईडीने ही रक्कम 'गुन्ह्यातून मिळालेला पैसा' म्हणून निश्चित केली आहे.
यापूर्वी जानेवारी २०२६ मध्ये ईडीने संबंधित ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त केली होती, तसेच सुमारे ५९ लाखांची बँक खाती गोठवली होती. याआधीच १७.४५ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती. ताज्या कारवाईनंतर प्रकरणातील आर्थिक चौकशी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.