Prashanti Chhari Theatre Actress | गोव्याच्या समृद्ध रंगभूमीवरील तेजस्वी अभिनेत्री; 500 हून अधिक प्रयोगांचा यशस्वी टप्पा

Prashanti Chhari Theatre Actress | भारतीय संस्कृतीतील नाट्यकला हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम मानले जाते. या कलेचा वारसा जपण्यात पुरुष कलाकारांइतकाच स्त्री कलाकारांचाही मोठा वाटा आहे.
Prashanti Chhari Theatre Actress
Prashanti Chhari Theatre Actress
Published on
Updated on

प्रशांती च्यारी

भारतीय संस्कृतीतील नाट्यकला हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम मानले जाते. या कलेचा वारसा जपण्यात पुरुष कलाकारांइतकाच स्त्री कलाकारांचाही मोठा वाटा आहे. घर, कुटुंब, नोकरी आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत अनेक महिला आज नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. त्यांच्याच या परंपरेतील एक उल्लेखनीय नाव म्हणजे अभिनेत्री प्रशांती श्यामसंदूर च्यारी.

Prashanti Chhari Theatre Actress
Goa Cyber Crime Record: दररोज 15 गोवेकर जाळ्यात, 6 महिन्यांत 41 कोटींचा गंडा; ई-झिरो एफआयआर नोंदणीत गोवा देशात चौथ्या स्थानावर

गोव्याच्या समृद्ध कोकणी व मराठी रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या प्रशांती च्यारी यांचा जन्म फोंडा तालुक्यातील सावईवेरे येथील मढळवाडा येथे झाला. त्यांनी एम.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने अवघ्या इयत्ता तिसरीत त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. बालकलाकार म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज व्यावसायिक अभिनेत्रीपर्यंत पोहोचला आहे.

आजवर त्यांनी गोवा तसेच राज्याबाहेरील विविध ठिकाणी ५०० हून अधिक नाट्यप्रयोग सादर केले आहेत. नैसर्गिक अभिनय, प्रभावी संवादाफेक, सहज देहबोली आणि प्रत्येक भूमिकेत समरस होण्याची क्षमता यामुळे त्यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

प्रशांती च्यारी यांनी 'विघ्नेश्वरा' या श्री गणेशावरील गीतमालिकेची निर्मिती करून त्यामध्ये अभिनयही केला. या कलाकृतीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच त्यांना 'कोकणी नाट्यक्षेत्रातील विश्वविक्रमधारक कलाकार' हा बहुमान प्राप्त झाला असून, त्यांच्या नाट्यसेवेची ही मोठी पावती मानली जाते.

'गाव जाला जाणतो' या लोकप्रिय नाटकामुळे त्यांची ओळख अधिक व्यापक झाली. त्याशिवाय कानी नव्या युगाची, सुवारी, सूर्य सावट, खतखटे, फॅमिली एक्सप्रेस, राव राव बाबुराव, अँग्री बर्ड, राखण, देव तुझे काय माझे, फटिंगपणा जिंदाबाद, काकाची अटी, माळीफटी, पैस घर, देवाले सुडकेचो श्वास, चांदणे शिंपीत जावे, जाता जाता, असे त्यांना म्हणात ना, घराणाइली सून आणि माय झाली होऊन या नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

त्यांच्या यशामध्ये आईचा मोठा वाटा असल्याचे त्या आवर्जून सांगतात. लहानपणापासून अभिनयाची आवड जोपासण्यासाठी आईने सातत्याने प्रोत्साहन दिले. कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अभिनय क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल करता आली, असे त्या नमूद करतात.

प्रसिद्ध नाट्यकर्मी राजदीप नाईक हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या सहवासातून अभिनयातील अनेक बारकावे शिकण्याची संधी मिळाली. 'मिक्सिंग फिक्सिंग' या नाटकाच्या निमित्ताने झालेल्या भेटीनंतर त्यांच्या व्यावसायिक अभिनयाला नवी दिशा मिळाली.

कोणतीही भूमिका स्वीकारल्यानंतर त्या तिचा सखोल अभ्यास करतात. नाटकाची संहिता अनेकदा वाचून त्या पात्राचा स्वभाव, मानसिकता, पार्श्वभूमी आणि भावविश्व समजून घेतात. त्यामुळे प्रत्येक भूमिका वास्तववादी आणि प्रभावी ठरते.

ग्रामीण आणि व्यावसायिक रंगभूमीतील फरक स्पष्ट करताना त्या सांगतात की, ग्रामीण रंगभूमीवर प्रेक्षक कलाकाराला समजून घेतात; मात्र व्यावसायिक रंगभूमीवर प्रत्येक प्रयोगात सर्वोत्तम सादरीकरण करावे लागते. त्यासाठी अधिक सराव, शिस्त आणि समर्पण आवश्यक असते.

आजवर त्यांनी १९ नाटकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. सूत्रधार, माधवी, आई, भुरगे अशा अनेक व्यक्तिरेखा त्यांनी समर्थपणे साकारल्या आहेत. त्यापैकी 'गाव जाला जाणतो' या नाटकातील भूमिका त्यांच्या विशेष जवळची आहे. या भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि ओळख मिळाली.

प्रशांती च्यारीयांसाठी रंगभूमी हा केवळ अभिनयाचा मंच नसून जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नाटकातील भूमिका स्वीकारल्यानंतर त्या त्या पात्रात पूर्णपणे समरस होतात. मात्र, रंगमंचावर असतानाही कुटुंबाची काळजी मनात कायम असते, असे त्या सांगतात.

त्यांच्या यशात आई-वडील आणि बहिणीचा सिंहाचा वाटा आहे. 'आज मला मिळालेला प्रत्येक पुरस्कार, सन्मान आणि प्रेक्षकांचे प्रेम हे माझ्या कुटुंबाच्या विश्वासामुळेच शक्य झाले,' असे त्या कृतज्ञतेने सांगतात.

अभिनयाबरोबरच संगीताचीही त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी गायलेल्या मराठी गीतांचे प्रसारण 'मायबोली' या वाहिनीवर झाले आहे. त्यामुळे अभिनयासोबत संगीत क्षेत्रातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना देश-विदेशात अभिनय करण्याची संधी मिळाली. लंडनमध्ये कोकणी नाटकाचे सादरीकरण हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय अनुभव ठरला. मुंबईच्या रंगभूमीवरही त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या असून या अनुभवांमुळे त्यांच्या अभिनयाला अधिक समृद्धी लाभली.

स्त्री कलाकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता सकारात्मक होत असल्याचे त्या नमूद करतात. महिलांना अधिक संधी, सुरक्षितता आणि सन्मान मिळत असून गोव्यात नाट्यशिक्षणालाही चालना मिळत आहे. त्यामुळे नव्या पिढीतील गुणी कलाकार घडत असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या मते अभिनय हे केवळ छंद नसून करिअरचे प्रभावी माध्यम आहे. तरुणांनी, विशेषतः महिलांनी, आत्मविश्वासाने नाट्यक्षेत्रात पुढे यावे, असे त्या आवाहन करतात.

Prashanti Chhari Theatre Actress
Dharashiv Crime | डिकसळ येथे गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त!

अभिनयामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल झाला. विविध भूमिका साकारताना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला. प्रत्येक भूमिका कलाकाराला काहीतरी शिकवून जाते, असे त्या सांगतात. रंगभूमीने मला दुःख पचवायला शिकवले. यश मिळाले म्हणून अहंकार बाळगू नये. कलाकाराचे पाय कायम जमिनीवर असले पाहिजेत, असे त्या आवर्जून सांगतात. एकपात्री अभिनय आणि एकांकिका स्पर्धांमध्येही त्यांनी राज्यस्तरावर अनेक पारितोषिके मिळवली आहेत.

स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा...

नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करताना त्या सांगतात, भूमिका लहान असो वा मोठी, ती पूर्ण प्रामाणिकपणे साकार करा. मेहनत, सातत्य आणि अभ्यास यांच्या जोरावर यश निश्चित मिळते. वामनराव पै यांच्या 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या विचारावर त्यांचा ठाम विश्वास आहे. प्रत्येकाने स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भविष्य घडवावे, असा त्यांचा संदेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news