मडगाव ; पुढरी वृत्तसेवा मडगावात सर्वात जून्या आणि पोर्तुगीजकालीन इमारतीपैकीं एक असलेल्या आरोग्य केंद्राच्या पुरातन इमारतीचा एक भाग आज (शनिवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कोसळला. पावसामुळे सदर इमारत कमकुवत झाली होती. हा प्रकार दिवसा घडला असता तर शेकडो जणांचा बळी गेला असता.
पोर्तुगीज कालीन ही इमारत मडगावतील सर्वांत जुन्या इमारतींपैकी एक आहे. गेले आठवडाभर सासष्टीला पावसाने झोडपून काढले आहे. आधीच कमकुवत बनलेल्या या इमारतीची डागडुजी करण्यात आली नव्हती. रात्री पावसाच्या तडाख्यात इमारतीच्या वरचा माजल्याचा भाग कोसळून पडला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक दुचाकी या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आल्याने दुचाकीचे नुकसान झाले.
जुन्या हॉस्पिसीयो इस्पितळासमोर असलेल्या या इमारतीत दर दिवशी शेकडोंच्या संख्येने लोक उपस्थिती लावतात. हा प्रकार दिवसा घडला असता तर लोकांसह आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांचा बळी गेला असता अशी भीती मडगावचे नागरीक विवेक नाईक यांनी व्यक्त केली आहे.
मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. कोसळेला ढिगारा बाजूला करण्यात आला असून, सुरक्षेचे उपाय म्हणून कोसळलेल्या भागावर ताडपत्री घालण्यात आल्याची माहिती दामू शिरोडकर यांनी दिली आहे.
हॉस्पिसियो इस्पितळ, मडगावची पालिका इमारत अशा कित्येक जुन्या इमारती मडगावात अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे त्या सर्व इमारतींचा वापर प्रशासकीय कामांसाठी केला जातो. कर्मचारी आणि नियमितपणे येणाऱ्या लोकांची संख्या हजारोंच्यावर असते. तरीही त्या इमारतींची डागडुजी केली जात नाही. आरोग्य केंद्राच्या या इमारतीचा दर्शनी भाग कोसळून पडल्यामुळे आता इतर जुन्या इमारतींचा विषय ऐरणीवर आला आहे. पालिकेने काही जुन्या इमारतीना असुरक्षित बांधकामांच्या यादीत टाकले होते. त्यांचे पुढे काय झाले असा प्रश्न विवेक नाईक यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :