पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठी आज (दि.8) मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र मतदानावेळी काही ठिकाणी हिंसाचार झाला. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. दरम्यान राज्यात पंचायत निवडणूक काळात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. ( W. Bengal Panchayat Election 2023 )
कूचबिहारमध्ये आज सकाळी एका मतदान केंद्राची तोडफोड आणि मतपत्रिका जाळण्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने (TMC) आपल्या पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांची रेजीनगर, तुफनगंज आणि खारग्राममध्ये हत्या झाली असून डोमकोलमध्ये झालेल्या गाेळीबारात दोन जण जखमी झाले आहेत, असा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे.
निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र, सर्वत्र कडेकाेट बंदोबस्तानंतरही काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार २२ जिल्ह्यांतील ६३,२२९ ग्रामपंचायत, ९,७३० पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ९२८ जागांसाठी मतदानास प्रारंभ झाला आहे. ५.६७ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीचा निकाल ११ जुलै रोजी लागणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी उत्तर २४ परगणा येथील मतदान केंद्रांना भेट दिली. यावेळी मतदार आणि उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला. यादरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) काही कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा वाटेत अडवला. यानंतर राज्यपालांनी या सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या.
पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीपूर्वी शुक्रवारी रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज भागात तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. हाणामारी दरम्यान एका घराची तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.