

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
फोंड्यातील नूतन पालिका बाजार प्रकल्पासाठी व्यापाऱ्यांचे स्थलांतर, शहरातील पार्किंगची समस्या, रिव्हरफ्रंट प्रकल्प आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या पुतळ्याची उभारणी या विषयांवर फौंडा पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
काही मुद्द्यांवर वादळी चर्चा झाली असली, तरी एकूण बैठक सकारात्मक आणि निकोप वातावरणात पार पडली. नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते.
बुधवारपेठ मार्केटमधील पालिका बाजार प्रकल्पाचे काम हाती घेण्यासाठी सध्याच्या मार्केट शेडमध्ये व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. या व्यापाऱ्यांनी नव्या मार्केट संकुलात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
मात्र, सुमारे पावणेदोनशे व्यापाऱ्यांना सामावून घेण्याइतकी जागा नव्या मार्केट संकुलात उपलब्ध नसल्याने त्यांना सध्याच्या मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या ऑरोबिंदो एअरपोर्ट रोडवर स्थलांतरित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी प्रशस्त शेड उभारण्यात येणार असून त्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांची सोय केली जाणार आहे.
फूटपाथवरील अतिक्रमणे हटविणार
फोंडा शहरातील पार्किंगची गंभीर समस्या आणि फूटपाथवरील अतिक्रमणांचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला. फूटपाथवर विक्रेते व्यवसाय थाटत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याबाबत नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली.
फूटपाथवरील अतिक्रमणे हटवून विक्रेत्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासह पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यावर यावेळी भर देण्यात आला.