

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर
फोंडा विधानसभा पोटनिवडणूक ९ एप्रिल रोजी होत असून फोंड्याचा १५ वा आमदार कोण यांचे उत्तर या निवडणुकीतून मिळणार आहे. सोमवारी भारतीय जनता पक्षातर्फे रितेश रवी नाईक, काँग्रेसतर्फे डॉ. केतन भाटीकर व आम आदमी पक्षातर्फे गीतेश नाईक यांनी आपापले उमेदवरी अर्ज उपस्थितीत भरले. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.
मागील सहा वेळा रवी नाईक यांनी जिंकलेला अंत्रुज महलावर नाईक यांचे वर्चस्व कायम राखण्यात रितेश यांना यश मिळते का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. फोंडा मतदारसंघाच्या निवडणुकांचा इतिहास पाहता माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी एकूण सहावेळा फोंडा मतदारंसघ जिंकला होता.
मगो, काँग्रेस व भारतीय जनता पक्ष या तीन वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हावर ते लढले व जिंकले होते. भाजपच्या उमेदवारीवर २०२२ मध्ये निवडून आल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारात कृषीमंत्री असताना रवी नाईक यांचे निधन झाले. त्यामुळे पोटनिवडणुक होत असून या पोट निवडणुकीत भाजपने फोंडाचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक असलेले रवी यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांना काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्याकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
आपचे उमेदवनार गीतेश नाईक हेही उभे असले तरी भाजप व काँग्रेस यांच्यातच येथे मुख्य लढत अपेक्षीत आहे. फोंडा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता गोवा मुक्तीनंतर १९६३ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत या मतदारसंघात मगो पक्षाचे गजानन रायकर हे निवडून आले. रवी नाईक यांच्या सहा वेळच्या आमदारकीचा विचार करता ते सर्वप्रथम १९८४ साली मगोच्या उमेदवारीवर विजयी झाले.
त्यानंतर १९८९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी मडकई मतदारसंघातून लढवली होती. त्यामुळे फोंडातून शिवदास बेरेकर यांना संधी मिळाली व ते दोन वेळा निवडून आले. रवी नाईक यांनी १९९९ साली मगोतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला व फोंडातून निवडून येऊन मुख्यमंत्री झाले. १९९९, २००२व २००७ अशा सलग तीन विधानसभा निवडणुका त्यांनी फोंडा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर जिंकल्या.
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मगोचे लवू मामलेदार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर २०१७च्या निवडणुकीत फोंडा मतदारसंघातून ते पुन्हा काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले. मात्र, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री झालेल्या डॉ. प्रमोद सावंत यांनी २०१९ मध्ये काँग्रेसला खिंडार पाडत १५ पैकी १० आमदारांना भाजपमध्ये आणले. त्यात रवी नाईक हेही होते.
त्यांना मंत्रिपद देण्यात आले. भाजपमध्ये असल्याने २०२२ ची निवडणूक त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली व जिंकले. मात्र, मगोचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी त्यांना कडवी लढत दिली. अवघ्या ७० मतांनी रवी नाईक जिंकले आणि फोंड्यात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले. आता त्यांचे पुत्र रितेश नाईक हे कमळ चिन्हावर पोटनिवडणूक लढत आहेत.
१४ निवडणुकांमध्ये ८ आमदार
आत्तापर्यंत झालेल्या फोंडा विधानसभेच्या १४ निवडणुकीत ८ आमदार झाले. त्यात सर्वात जास्त सहा वेळा रवी नाईक हे आमदार बनले. रोहिदास नाईक व शिवदास वेरेकर हे प्रत्येकी दोन वेळा आमदार झाले, तर गजानन रायकर, शशिकला काकोडकर, जोईल्दो आगीयार व लवू मामलेदार हे प्रत्येकी एकदा निवडून आले.