

पेडणे : पेडणे तालुक्यातील नानेरवाडा आणि न्हयबाग भागांत रविवारी रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडून लाखो रुपयांच्या वस्तू लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
न्हयबाग परिसरातील चार ट्रकांच्या बॅटर्याही चोरट्यांनी लंपास केल्याने या परिसरात वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून पेडणे परिसरात चोर्या, घरफोडीचे प्रकार वाढू लागले आहे. पेडणे चोरट्यांच्या टार्गेटवर असताना पोलिस यंत्रणा निद्रिस्त असल्याचा आरोप लोकांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हळदणकर यांचे दुकान तसेच लवू कुडव यांच्या बार शेजारील गॅरेजमध्ये चोरी करून पैसे आणि इतर वस्तू चोरट्याने लंपास केल्या. दीपक हळदणकर,अॅन्ड्रयू फर्नांडिस यांच्या ट्रकांच्या बॅटर्या चोरट्याने चोरून नेल्या.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी 14 जुलै रोजी नानेरवाडा येथे भरदिवसा रेणुका शिरोडकर यांच्या घरातही चोरी झाली होती. चोरट्यांनी कुलूप तोडून सुमारे तीन लाखांचे मंगळसूत्र व 70 हजार रुपये रोख रक्कम चोरली होती. चोरीच्या वेळी वरच्या मजल्यावर राहणार्या भाडेकरूला खोलीतच बंद करून ठेवले होते. या घटनेनंतरही पोलिस यंत्रणा सुरक्षेच्या उपाययोजना राबवत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दुकाने आणि घरफोड्यांमुळे संपूर्ण बाजारपेठ व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरी झालेल्या भागांत सीसीटीव्ही नसल्याचा चोरट्यांनी फायदा घेतल्याचे समोर आले आहे. पेडणेच्या माजी नगराध्यक्ष तथा नानेरवाडा प्रभाग 4 च्या नगरसेवक उषा रुद्रेश नागवेकर यांनी पेडणे पोलिस ठाण्यात पत्र देऊन रात्रीच्यावेळी पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी केली. पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व संशयित हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. सतत घडणार्या चोरीच्या घटनांनी पेडणे पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
लाखो रुपयांच्या वस्तू लंपास, चार ट्रकांच्या बॅटर्यांचीही चोरी
पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; पेडणेतील नागरिकांमध्ये भीती
नानेरवाडा येथे भर दिवसा 14 जुलै रोजी राजेश शिरोडकर कुटुंबाच्या घरात चोरी करून मंगळसूत्र तसेच रोख रक्कम चोरीला गेली. त्यामुळे प्रभागात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पोलिसांनी अजूनपर्यंत चोरट्यांना पकडले नाही. त्यामुळे वारंवार या भागात चोर्यांचे सत्र सुरू आहे. वाड्यावरील लोक भयभीत झाले आहेत. पेडणे पोलिसांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी केली आहे.