

ओरोस : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी रामा नवसो परवार (29, रा. वडावल-बिचोली गोवा) आणि रोहिदास गुरुदास परवार (22, कासारपाल- बिचोली गोवा) या दोघा युवकांना भादवि कलम 332, 34 अन्वये दोषी धरून एक महिना साधी कैद, भादवि कलम 353 अन्वये दोषी धरून प्रत्येकी 1000 रुपये दंड अशी शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ठोठावली.
या दोघा आरोपींवर भा.दं.वि.कलम - 353,332,120इ 504,34 अन्वये शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सुनील बागल यांनी फिर्याद दिली होती. उपनिरीक्षक श्री. बागल हे दोडामार्ग पोलिस ठाणे अंतर्गत महाराष्ट्र - गोवा बॉर्डर येथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना चेकपोस्ट वर शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपी रोहित परवार याची गाडी त्यांनी तपासणी करिता थांबवली. याचा मनात राग धरून काही वेळाने गुरुदास याने रामा परवार याला सोबत आणत पोलिस उपनिरीक्षक सुनील बागल यांना धक्काबुक्की केली. तसेच हातातील वाहनाचे केबलने श्री. बागल यांना हाताच्या कोपरावर व पाठीवर मारून दुखापत करून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पुन्हा दाखल केला होता.
याबाबतचा तपास सहा. पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील (सध्या नेमणूक जयगड पोलिस स्टेशन) यांनी केला होता. हा खटला 22 मार्च 2020 रोजी दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल 28 जुलै रोजी देण्यात आला. या खटल्यात सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी फिर्यादी सुनील विश्वास बागल, पंच संजय शिरोडकर व अर्जुन भगवान पाटमोर, साक्षीदार पो.हवालदार श्री.मळगावकर, नीलेश नीलमवार, दोडामार्गचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, तपासिक अधिकारी कुलदीप संभाजी पाटील असे सात साक्षीदार तपासले. त्यांची साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने या दोघांना कारावासाची शिक्षा ठोठावली.