

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय जनगणनेच्या कामासाठी पेडणे तालुक्यातील पंचायत सचिवांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने या कालावधीत ते नियमित कार्यालयीन कामकाजासाठी उपलब्ध राहणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रत्येक गावासाठी एका पंचायत सचिवाची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण पेडणे येथील भाग शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात देण्यात आले. पेडणे मामलेदार कार्यालयाच्या आदेशानुसार या प्रशिक्षणास पंचायत सचिवांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती. या शिबिरात एकूण २७ पंचायत सचिव सहभागी झाले.
जनगणना कार्यासाठी पंचायत सचिवांना प्रत्यक्ष गावागावांत फिरावे लागणार असल्याने पंचायत कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यांना सलग महिनाभर या कामात गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने नियुक्त करावे, तसेच पंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर आगाऊ माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पंचायत सचिवांना जनगणनेचे काम दिल्यामुळे त्याचा गावातील विकासकामावर परिणाम होणार आहे. त्यासोबतच ग्रामस्थांची विविध कामे प्रलंबित राहणार आहेत. त्यामुळे पंचायत सचिवांना या कामातून वगळावे, अशी मागणी होत आहे. याशिवाय पंचायत सचिवांऐवजी मुख्य कार्यालयातील इतर कर्मचारी किंवा मनरेगा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचाही पर्याय प्रशासनाने विचारात घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.