

पेडणे : येथील पोलिसांनी टॅक्सी चालकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात पारधी टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना यापूर्वीच अटक तर एका अल्पवयीन आरोपीची रवानगी 'अपना घर' येथे करण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीतील फरार आरोपीलाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
त्याला सांगली (महाराष्ट्र) येथून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. १० जुलै २०२५ रोजी पेडणे पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. फिर्यादी संजीवन कृष्णा वेंगुर्लेकर (रा. प्रभूवाडा, कळंगुट) हे जीए ०३ डब्ल्यू ४१८० क्रमांकाच्या टॅक्सीचे चालक व मालक आहेत.
९ जुलै २०२५ रोजी रात्री ८.४५ ते ९ दरम्यान सहा अज्ञातांनी कळंगुट येथून पत्रादेवी येथे जाण्यासाठी त्यांची टॅक्सी भाड्याने घेतली. राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील मालपे न्हयबाग रस्त्यावर त्यांनी फिर्यादीला धारदार शस्त्राने चेहरा, डोके, डावा खांदा व डाव्या हातावर हल्ला करून गंभीर जखमी केले.
तसेच टॅक्सी चोरण्याचा आणि फिर्यादीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. तपासादरम्यान संशयित पाच आरोपी व एका अल्पवयीन आरोपीची ओळख पटली. त्यांचे तपशील व छायाचित्रे महाराष्ट्र पोलिसांकडे पाठविण्यात आली. तपासात हेही निष्पन्न झाले की संबंधित आरोपी महाराष्ट्रातील अनेक चोरीच्या गुन्ह्यांत सामील असून ते पारधी टोळीचे सदस्य आहेत.
११ जुलै २०२५ रोजी १७वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन 'अपना घर' मेरशी येथे ठेवण्यात आले. तर, २२ जुलै २०२५ रोजी शंकर माधुकर पवार उर्फ हाड्या (वय २४), राजू माधुकर पवार उर्फ गुड्या (वय २३, दोघे रा. सारोळे, मोहोळ, सोलापूर), अजय सुनील भोसले (वय २७, रा. धनेगाव, तुळजापूर, धाराशिव) यांना अटक