

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मानव तस्करीविरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला रायबंदर येथील क्राईम ब्रांचने सापळा रचून केलेल्या कारवाईत वेश्या व्यवसासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन तरुणींची सुटका केली. त्यांची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात करण्यात आली.
अज्ञात एजंटविरुद्धात गुन्हा दाखल करून शोध सुरू असल्याची माहिती पोलिस जनसंपर्क अधिकारी तथा अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार बोगस ग्राहक पाठवून एजंटशी संपर्क साधण्यात आला.
जुने गोवे येथे दोन तरुणी पाठवण्याचा सौदा एजंटशी ठरवण्यात आला. दूरध्वनीद्वारे झालेल्या संभाषणातून एजंट मानव तस्करीचा संघटित रॅकेट चालवत असल्याचे स्पष्ट झाले. मानव तस्करीचे संघटित रॅकेट ओळखण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
एजंटने पीडित तरुणींना वेश्या व्यवसासाठी संबंधित ग्राहकाकडे पाठवले असता त्या तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एजंटाची त्यांना काहीच कल्पना नाही.
बेकायदेशीर आर्थिक फायदा मिळवून एजंट हा पीडितांच्या लैंगिक शोषणातून मिळणाऱ्या उत्पन्नावर जगत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी क्राईम ब्रँचने अज्ञात एजंटाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४३ (१), (२) व (३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ मधील कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.