

म्हापसा : फोंडेकवाडा, पर्रा येथे एका बांधकाम प्रकल्पावर काम करणार्या द्रौपदा तुलाराम नाईक (रा. ओडिशा) मजुराचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी सत्या नंबारपुरा (50 वर्षे) व थाबीर नंबारपुरा (31 वर्षे) या मूळ ओडिशातील पिता-पुत्राला अटक केली आहे. ही घटना सोमवारी 7 रोजी रात्री 10.30 वाजता घडली होती.
पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बांधकाम प्रकल्पावर द्रौपदा हा तेथील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता. कंत्राटदाराचा पर्यवेक्षक विजय नाईक (रा. बस्तोडा, मूळ रा. कर्नाटक) हा त्या प्रकल्पावर जेव्हा गेला तेव्हा त्याला द्रौपदा हा त्या पत्र्याच्या शेडमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याने तक्रार दिल्यानंतर म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103/1 नुसार गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली.
बांधकाम प्रकल्पावर द्रौपदासह सत्या व थाबीर काम करत होते. हे दोघेही कळंगुट येथे राहतात. ते रोज सकाळी या प्रकल्पावर कामाला येत असत. घटनेच्या दिवशी दुपारी पिता-पुत्र व द्रौपदा यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यामुळे पर्यवेक्षकाने त्यांना कळंगुटला पाठवले होते.
द्रोपदा हा सत्याचा पुतण्या होय. ते दोघेही नातेवाईक होते. सायंकाळी पिता-पुत्राने घटनास्थळी येऊन द्रौपदा याचा खून केला. त्यांनी द्रौपदा याचे डोके दगडाने ठेचले तसेच गुप्तांग व पोटावर वार केले होते.
खुनाची माहिती मिळतच उपाधीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी उपनिरीक्षक बाबलो परब, अजय धुरी यशवंत मांद्रेकर, उत्क्रांतो देसाई, विराज कोरगावकर, मंगेश पाळणी, आदित्य गाड, रवीना स्वातोडकर, दत्तप्रसाद पंडित, हवालदार सुशांत चोपडेकर, राजेश कांदोळकर, प्रकाश पोळेकर, महेंद्र मांद्रेकर, आनंद राठोड, अक्षय पाटील, समीप, नितेश, संदेश व अनिल यांच्या सहकार्याने तपास कामास सुरुवात केली.
घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. खून केल्यानंतर सत्या व थाबीर हे दोघेही जवळच्या शेतात लपून बसले होते. पोलिसांनी त्यांना अटक केली असून खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून संशयितांची चौकशी सुरू असल्याचे डिसोझा यांनी सांगितले.