

पणजी : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होत असून ते 8 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या 15 दिवस चालणार्या अधिवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी होत असून यात अधिवेशनाचे कामकाज ठरेल.
सरकार विधानसभेचे कामकाज कमी करत असून ही लोकशाहीची हत्या आहे, अशा आरोपाच्या पार्श्वभूमीवर 21 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यासाठीच्या सल्लागार समितीची बैठक मंगळवारी 8 रोजी होत आहे. सभापती रमेश तवडकर, उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, संसदीय कार्यमंत्री आलेक्स सिक्वेरा, वीजमंत्री सुदीन ढवळीकर, आमदार विजय सरदेसाई, वीरेश बोरकर, व्हेन्जी व्हिएगस या समितीचे सदस्य आहेत. या बैठकीत प्रामुख्याने अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालावे हे असून याकरिता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेळेचे नियोजन करणे, विधेयक, बिले, विविध स्वरूपांचे कायदे, प्रश्नोत्तरे याबाबतची चर्चा आणि समन्वय हा आहे.
विरोधी पक्षनेते आलेमाव म्हणाले, सरकारकडून विरोधकांना योग्य आणि मापक वेळ दिला जात नाही. प्रश्नांची योग्य उत्तर दिली जात नाहीत. काही प्रश्नांची उत्तरे अगोदर मिळत नाही. अशा अनेक तक्रारी आहेत, त्या लेखी स्वरुपात सभापतीसमोर आम्ही मांडू.