

पणजी लोकोत्सवात २२ राज्यांतील कलाकारांनी लोककला व परंपरांचे सादरीकरण केले
गोव्याची ओळख केवळ बीच आणि पार्टीपुरती मर्यादित नसल्याचे मंत्री रमेश तवडकर यांचे प्रतिपादन
दहा दिवस चाललेल्या लोकोत्सवाला देशी-विदेशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कलाकार, पथके आणि विविध स्पर्धांतील विजेत्यांचा समारोप प्रसंगी सन्मान
पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी लोकोत्सवात दहा दिवस चाललेल्या देशभरातील स्टॉल्समुळे संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचे आणि कलेचे भव्य दर्शन घडले. मागील १० दिवसांत भारतीय कलेच्या आविष्काराची मेजवानी अनुभवण्याची संधी माझ्यासह सर्वांनाच मिळाली. देशातील २२ राज्यांमधील कलाकारांनी आपल्या लोककला, लोकनृत्य, संगीत, हस्तकला व परंपरांचे सादरीकरण करून यंदाचा महोत्सव अधिक रंगतदार केला.
गोव्याची खरी ओळख ही येथील परंपरा, लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वारशात दडलेली असल्याचे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी केले. समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर, संचालक विवेक नाईक, उपसंचालक मिलिंद माटे, डॉ. अजय गावडे, आनंद कवठणकर, धाकू मडकईकर, जीटीडीसीचे एमडी कुलदीप आरोलकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
मंत्री तवडकर म्हणाले, या लोकोत्सवाच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रातील विविधतेचा खरा करिष्मा अनुभवता आला. गोव्याची ओळख केवळ पार्टी, बीच आणि क्लब संस्कृतीपुरती मर्यादित आहे, असा समज आहे. मात्र तो फक्त ३० टक्के भाग आहे. गोव्यातील स्थानिक नागरिकांनी जतन केलेल्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीमुळेच गोव्याची वेगळी ओळख निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
लोकोत्सवाचा आनंद केवळ गोमंतकीय आणि भारतीय नागरिकांनीच नव्हे, तर परदेशी पर्यटकांनीही मनापासून घेतला. आपल्या गोव्याची खरी ओळख जगासमोर मांडण्यासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांची नितांत गरज आहे. आपल्या लोककला आणि लोकपरंपरांच्या माध्यमातून गोव्याची वास्तविक सांस्कृतिक ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कला आणि संस्कृती खात्यातर्फे घेण्यात आलेल्या नाताळ देखावा स्पर्धेतील विजेत्यांचे, चित्रकला स्पर्धेचे तसेच २२ राज्यांतून आलेल्या पथकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कलाकारांचे आभार !
लोकोत्सव २०२६ने सांस्कृतिक एकतेचा संदेश देत गोवा आणि भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवले. यामध्ये २२ राज्यांतून आलेल्या कलाकारांचे विशेष कौतुक करावे लागेल. मी या दहा दिवसांमध्ये प्रत्येक स्टॉलवर जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, सर्व दुकानदारांनी समाधान व्यक्त केले, असे तवडकर म्हणाले.