

पणजी : प्रभाकर धुरी
असोल्या न (सोललेल्या) नारळावरचे कोरीव काम लक्षवेधी ठरले असून लोकोत्सवात या हटके कलाकृतींचीच चर्चा आहे. व्यवसायात इतरांपेक्षा वेगळी वाट चोखाळणाऱ्या नाईक कुटुंबीयांकडून (पणजी) या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री यासाठी स्टॉल लावण्यात आला होता. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे विक्रेत्या माया अनंत नाईक यांनी सांगितले. माया नाईक म्हणाल्या, गेली १०-१५ वर्षे आम्ही हा व्यवसाय करतो.
नारळावर कोरीव काम व पेंटिंग करून वेगवेगळे मुखवटे किंवा वस्तू बनवण्याचे काम फारच थोडे कलाकार करतात. त्यामुळे माझा भाऊ अनिल याने हा व्यवसाय निवडला. तो स्वतः फाईन आर्ट शिकला आहे. त्यामुळे या कलेत तो निपुण आहे. त्याला मी आणि कुटुंबातील अन्य सदस्य मदत करतात. तो वस्तू बनवतो.
मी प्रदर्शनात सहभागी होऊन विक्री करते. विक्रीसाठी मला माझ्या स्नेही, हस्त कारागीर निकिता सदानंद मोरजकर अधूनमधून मदत करतात. माया नाईक म्हणाल्या, मी आतापर्यंत दिल्ली, हरयाणा, सुरजकुंड, पुणे, मुंबई येथे प्रदर्शनात सहभागी झाले आहे. गोव्यातही अनेक ठिकाणी मी जाते. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. माझ्या स्टॉलवरील वेगवेगळ्या वस्तूंचे दर २०० रूपयांपासून ५०० रूपयांपर्यंत आहेत. ग्राहक पैशांऎवजी शोभेच्या टिकावू व कलात्मक वस्तू म्हणून खरेदी करतात असेही त्या म्हणाल्या
गांधीजींची तीन माकडे आणि बरेच काही
नारळावर कासव, गणपतीचा मुखवटा, गांधीजींची तीन माकडे कोरण्यात अनिल नाईक यांचा हातखंडा आहे. त्यांनी नारळ पोखरून त्यात बाटली फिट करून सुतळीचा वापर करून सुबक, सुंदर बाटली रोज वापरण्यासाठी नारळापासून बनवली आहे.
शो केसची शोभा वाढवणाऱ्या वस्तू
या वस्तूंचे वैशिष्ट्य म्हणजे कोरीव काम करण्यासाठी नारळ फोडला जात नाही. पूर्ण नारळ पाण्यासह ठेवला जातो. कालांतराने पाणी सुकले, तरी नारळ टिकून राहतो. त्यामुळे या वस्तू अनेक वर्षे टिकतात. रंग फिका पडल्यास रंगवता येत असल्याने आपल्या शो केसची शोभा वर्षानुवर्षे या वस्तू वाढवत राहतात. यांच्या स्टॉलवर काही सुंदर पेंटिंग्ज सुद्धा पाहायला मिळतात.