

Pakistani national petition in Supreme Court of India
पणजी : गोवा सोडून जाण्याचे आदेश दिल्यानंतर गोव्यात राहणार्या पाकिस्तानी व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान'चा पासपोर्ट असलेली ही व्यक्ती गोव्यात दीर्घ व्हिसावर राहात आहे.
एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा बळी गेल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात राहणार्या पाकिस्तांनी नागरिकांनी देश सोडून जावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार काहीजण गेले. मात्र, दीर्घकालीन व्हिसावर गोव्यात राहणार्या एका पाकिस्तानी नागरिकाने केंद्र सरकारच्या आदेशा विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
केंद्राच्या निर्देशांनुसार, गोवा सरकारने पाकिस्तानी नागरिकांना राज्य आणि देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत आणि दीर्घकालीन व्हिसा असलेल्या 7 व्यक्तींची ओळख पटवली आहे. त्यातील याचिकाकर्ता 2016 पासून गोव्यात राहत आहे. पाकिस्तानी नागरिकाच्या वकिलांनी गुरुवारी न्यायमूर्ती संजय करोल आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा तातडीने नोंदवण्यासाठी मांडला. खंडपीठाने योग्य वेळी याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शविली.
2016 पासून दीर्घकालीन व्हिसावर गोव्यात राहणार्या एका पाकिस्तानी नागरिकाचा हा प्रश्न आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, भारत सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे, असे वकिलांनी सांगितले. तथापि, वकिलांनी सांगितले की, याचिकाकर्ता त्याच्या हद्दपारीला विरोध करत नाही, परंतु दीर्घकालीन व्हिसामध्ये एक विशिष्ट अट असल्याने त्याला फक्त सुनावणीची योग्य संधी हवी आहे, असे वकिलांनी म्हटले असून या याचिकेवरील सुनावणीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.