

पणजी : गोवा सरकारने साक्षरतेमध्ये शंभर टक्के यश साध्य केले आहे. त्याचबरोबर पाणी, वीज आणि शौचालय सुविधांमध्येही गोवा शंभर टक्के यशस्वी झालेला आहे. येत्या काळात भारताला टीबीमुक्त करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. गोवा राज्य टीबीमुक्त करण्याचा निर्धार मुTB freeख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी घटकराज्य दिन सोहळ्यात व्यक्त केला.
कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित 39 व्या घटक राज्य दिन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो, सुदिन ढवळीकर, सुभाष फळदेसाई, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, उपसभापती जोशुवा डिसोझा, अॅड. जनरल देविदास पांगम, मुख्य सचिव डॉ. व्ही कांडावेलू उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय समोर ठेवले आहे. गोव्यात विकास प्रकल्प उभारताना मानवी विकास करून तळागाळांतील लोकांचे जीवनमान उंचावून 2037 पर्यंत विकसित गोवा करण्याचे राज्य सरकारचे ध्येय आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोवा ही पवित्र भूमी आहे, परशुरामाने निर्माण केलेल्या भूमीचा सर्वांगीण विकास व्हावा, आध्यात्मिक पर्यटन क्षेत्र व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसीत भारत करण्याचे जे ध्येय ठेवले आहे त्या ध्येयाच्या पावलावर पाऊल ठेवून गोवा 2037 पर्यंत विकसीत करण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवत आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर व त्यानंतर सत्तेवर आलेल्या सर्वच सरकारांनी गोव्याच्या विकासासाठी काम केले आहे. मात्र केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्याचा वेगाने विकास झाला. अनेक प्रकल्प उभे राहिले. गोवा सर्वार्थाने बदलला. असे सांगून प्रत्येक घटक राज्य दिनी गोव्याच्या विकासामध्ये योगदान दिलेल्या जुन्या आस्थापनांचा गौरव करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील 191 ग्रामपंचायतींनी 14 पालिकांनी स्वयंपूर्ण मित्रांच्या सहकार्याने ‘स्वयंपूर्ण गोवा‘साठी केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याचे सांगून गोवा पिण्याचे पाणी, वीज, शौचालय उभारणीमध्ये 100 टक्के यशस्वी झाले. आता साक्षरतेतही 100 टक्के यशस्वी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात लोकांचा विकास हेच लक्ष्य समोर ठेवून अंत्योदय तत्त्वावर आपण काम करून ग्रामोदय विकास साधल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सुरुवातीला कला व संस्कृती खात्याच्या कर्मचार्यांनी मराठीतून स्वागत गीत सादर केल्यानंतर वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की गेल्या बारा वर्षांमध्ये गोव्याचा भरी विकास होऊन गोवा पूर्णपणे बदलल्याचे सांगितले. लोकांचे जीवनमान विकसित करण्याचे ध्येय डबल इंजिन सरकारने ठेवल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गोव्याचा चेहरा मोहरा बदलल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.
गोव्यामध्ये कोकणी व मराठी या दोन्ही भाषांच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दोन्ही भाषांना घेऊन सरकार पुढे जात आहे. भेदभाव करत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यातील विद्यार्थ्यांना गोवा मुक्तीचा इतिहास सुलभपणे कळावा यासाठी ‘भारत है हम’ ही गोवा मुक्तीवरील अॅनिमेशन सिरीज तयार करण्यात येत आहे. 19 डिसेंबर पूर्वी ही सिरीज पूर्ण होणार आहे. आज घटक राज्य दिनी त्याचा प्रोमो दाखवला गेला. ग्राफीटी स्टुडिओतर्फे ही सिरीज तयार केली जात असून ग्राफीटीचे मंजूळ श्रॉप यांनी प्रोमो सादर केला यावेळी तिलक शेट्टी उपस्थित होते.