

पणजी : मान्सूनला सुरुवात झाली आणि निसर्गनियमानुसार बेडकांचा ‘डराव डराव’चा आवाज सुरू झाला आहे. हा आवाजच बेडकांच्या जीवावर उठला आहे. जंपिंग चिकनसाठी बेडूक पकडणार्यांना वन खात्याने इशारा दिला आहे. बेडूक पकडणार्यांना तीन ते चार वर्षांच्या शिक्षेची तरतूद वन संरक्षण कायद्यात आहे. बेडकाचे मांस खाणारे असल्यामुळे ते विक्री करणार्यांची संख्याही वाढली आहे. बेडकाची शिकार करणार्यांविरोधात वन खात्याकडून दरवर्षी मोहीम राबविली जाते.
गोव्यात मान्सून सुरू झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांत जंपिंग चिकन अर्थात मोठ्या बेडकांच्या शोधात हे शिकारी रात्री-अपरात्री फिरत असतात. राज्यात बेडकांना पकडण्यास किंवा त्यांची शिकार करण्यावर बंदी असूनही दरवर्षी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काहीजण शेकडो बेडकांचे बळी घेतात.
वन खात्याच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळ झाली की बेडूक मारण्यास काही युवक गटागटाने बाहेर पडतात. वन खात्याचे अधिकारी मागावर असल्याची जाण़ीव असतानाही जंपिंग चिकनसाठी वाट्टेल ते करण्याची तयारीही काहींची असते आणि त्यासाठी मग बेडूक शोधण्याचा आटापिटा सुरू होतो. दक्षिण गोव्यात बेडूक खाणार्यांची संख्या जास्त आहे. काही रेस्टॉरंटही या दिवसांत बेडकाच्या मांसापासून तयार केलेले महागडे पदार्थ विक्रीला ठेवत असल्याची चर्चा आहे; मात्र त्याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नसल्याने वन खाते कारवाई करू शकत नाही.
वन खाते राज्यामध्ये बेडकांची शिकार होऊ नये, यासाठी प्रयत्न करत असते; मात्र वन खात्याच्या अधिकार्यांची नजर चुकवून अनेक ठिकाणे बेडकांचे मुडदे पाडले जातात. पर्यावरणप्रेमींनी बेडकांच्या शिकारीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वन्यप्राणी संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, बेडकांची शिकार करणार्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
याबाबत पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर म्हणाले, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार बेडकांची शिकार करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षाही होते; मात्र तरीही गोव्यात मोठ्या प्रमाणात बेडकांची शिकार केली जाते. बेडूक पर्यावरणाचे संतुलन राखतात. डास व डासांच्या अळ्या ते खातात. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होण्यास अटकाव होतो. काही व्यक्ती दरवर्षी बेडकांची शिकार करतात. वन खात्याच्या अधिकार्यांनी सतर्क राहून बेडकांची शिकार करणार्यांना कठोर शिक्षा करावी. दुसरीकडे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लोकांमध्ये बेडकांची शिकार का करू नये, याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. जागृती आणि शिक्षा या दोन माध्यमांतूनच बेडकांची शिकार कमी होऊ शकते.
बेडकांना मारण्याबाबत वन अधिकार्यास विचारले असता ते म्हणाले, वन खात्याने बेडकांना मारण्यापासून रोखण्यासाठी पथके तयार केली आहेत. ज्या भागांत बेडकांना मारत असल्याचे यापूर्वी आढळले होते, त्या भागांत पथकांची गस्त सुरू आहे. एखादी व्यक्ती बेडूक पकडताना किंवा बेडूक मारून घेेऊन जाताना सापडली, तर तिला अटक करून कारवाई केली जाणार आहे.
नेहमीचेच खवय्ये... बेडकाचे मांस खाणारे खवय्ये हे नेहमीचेच असतात. बहुतांश गोमंतकीय ते खात नाहीत; मात्र खवय्यांना ते नेमके कुठे मिळते, हे माहीत असते. त्यामुळे ते तेथे जाऊन चोरीछुपे जंपिंग चिकनवर ताव मारतात.
आकाराप्रमाणे दर... बेडकांच्या आकारानुसार शिकारी बेडकांची विक्री करतात. पाचशे रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत एका बेडकाची किंमत घेतली जाते, अशी माहिती वन खात्याच्या अधिकार्याने दिली.