गोवा : दूधसागर जंगलात पर्यटकांना सोडून पसार होणाऱ्या ‘ओरिसा’चे प्रताप

गोवा : दूधसागर जंगलात पर्यटकांना सोडून पसार होणाऱ्या ‘ओरिसा’चे प्रताप
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : ओडिशाचा रहिवासी असलेला आणि स्वतःचे टोपण नाव 'ओरिसा' असे वापरून बेकायदेशीरपणे पर्यटकांना दूधसागरावर नेऊन त्यांचा जीव धोक्यात घालणार्‍या या बोगस गाईडचे विविध कारनामे समोर येऊ लागले आहेत. मागील वर्षी या ओरिसामुळे भोपाळ येथील 'त्या' अभियंत्याचा दूधसागर नदीत बुडून मृत्यू झाला होता. कुळे भागातील प्रशिक्षण घेतलेल्या त्या ११० गाईडसची सध्या परिस्थिती बिकट झाली असताना या ओरिसाची दर दिवसाची कमाई पन्नास हजार एवढी आहे. रेल्वे पोलिसांच्या कारवाईला घाबरुन कित्येकदा त्याने पर्यटकांना दूधसागरावर सोडून पळ देखील काढला आहे. ओरिसा या गाईडपासून सावध रहा, असा इशारा येथून वाईट अनुभव घेऊन गेलेले पर्यटक सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ लागले आहेत.

दूधसागर धबधबा देशविदेशातील पर्यटकांमध्ये बराच प्रसिद्ध आहे. धबधब्याबरोबर ट्रेकिंग करत धबधब्याच्या माथ्यावर जाण्यास ट्रेकर्स जास्त उत्सुक असतात. सेटिंग असल्याशिवाय कुळेतून रेल्वेच्या माध्यमातून दूधसागरवर जाणे आणि रेल्वे थांबवून तिथे उतरणे शक्य नसल्याने स्थानिक गाईड ती जोखीम पत्करत नाहीत. त्याचा गैरफायदा या ओरिसा नामक बनावट गाईडने उठविला आहे. सत्तर ते शंभर जणांचा गट घेऊन रेल्वेमार्गे बेकायदेशीरपणे दूधसागरावर नेण्यासाठी तो त्यांच्याकडून प्रतीव्यक्ती अडीचशे रुपये आकारतो. रेल्वे पोलिसांकडे असलेल्या छुप्या संबंधामुळे एवढी वर्षे तो हा व्यवसाय करत आला आहे. पण मागीलवर्षी भोपाळस्थित एका अभियंत्याचा बुडून मृत्यू झाल्यानंतर त्याचे हे पितळ उघडकीस आले. बर्‍याचदा रेल्वे पोलिसांच्या कारवाईला घाबरून रात्री-अपरात्री त्या घनदाट जंगलात पर्यटकांना तो सोडूनही आलेला आहे. त्याच्या कारनाम्याचे कित्येक किस्से युट्यूब ब्लॉगर्सनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकले असून बोगस पर्यटन मार्गदर्शकापासून सावध रहाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कुळेतील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ओरिसा ऊर्फ कृष्णा याचे रेल्वे पोलिसांशी घनिष्ठ संबध आहेत. दूधसागरवर जाण्यासाठी पर्यटक कुळेत उतरताच त्यांना हेरून थेट रेल्वे स्थानकावर नेण्याचे काम हा ओरिसा करतो. सत्तर ते शंभर पर्यटकांचा गट तयार करून त्यांना दुपारी ३.३० वा. रेल्वे स्थानकावर येण्यास सांगितले जाते. संध्या. ४ ते सव्वाचारच्या दरम्यान लोंढामार्गे जाणार्‍या ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यात त्यांना बसवले जाते. स्वतः ओरिसा सर्वात शेवटी चढतो आणि सर्वांकडून पैसे गोळा करतो. ही रेल्वे दूधसागर धबधबा येण्यापूर्वी इंजिन काढण्यासाठी काही काळ थांबवली जाते आणि तीच संधी साधून सर्व पर्यटकांना तिथेच उतरवले जाते. रेल्वे रुळावरून सुमारे दोन किलोमीटर चालल्यानंतर त्या पर्यटकांना दूधसागर धबधब्याचे दर्शन घडवले जाते. आणि संध्याकाळी लोंढ्यावरून कुळेत उतरणार्‍या रेल्वेच्या शेवटच्या डब्ब्यात त्यांना कोंबून परत खाली पाठवले जाते. या ओरिसाचा दरारा एवढा आहे की, त्याने हात दाखवताच खास त्याच्या पर्यटकांसाठी दूधसागरावर रेल्वे थांबवली जाते.

एकाचवेळी त्याची कमाई सत्तर हजार ते एक लाख एवढी होते. चार महिन्यांपूर्वी साठ जणांच्या पथकाला घेऊन ओरिसा दूधसागरवर गेला होता. पण परत येणारी रेल्वे रद्द झाली आणि त्या घनदाट जंगलातील रेल्वे रूळावर उपाशीपोटी पर्यटकांना रात्र काढावी लागली. यात महिला आणि तरूण मुलींचाही समावेश होता. त्या घटनेचे व्हिडिओ युट्युबवर त्या पर्यटकांनी व्हायरल केलेले आहेत.

ओरिसाला तडीपार करा…

यापूर्वी अनेकदा ओरिसाने पर्यटकांचा जीव धोक्यात घातला आहे. वन खात्याच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, ओरिसा पर्यटकांना थेट रेल्वेतून घेऊन जात असल्याने त्या पर्यटकांची नोंदणी वन खात्याकडे नसते. तो व्यवहार गुपचूप होत असल्यामुळे रेल्वेकडेही पर्यटकांची माहिती नसते. मागीलवेळी भोपाळ येथील बुडून मरण पावलेल्या त्या अभियंत्याला ओरिसाच घेऊन गेला होता. त्याच्याबरोबर त्याचे सहकारी होते म्हणून त्या दुर्घटनेला वाचा फुटली. अन्यथा कोणालाच त्याच्या मृत्यूची माहिती कळली नसती. त्या ओरिसावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्याला गुन्हेगारांप्रमाणे तडीपार न केल्यास भविष्यात पर्यटकांसाठी तो कर्दनकाळ ठरू शकतो, असे त्यांनी आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

मैनापीतील दुर्घटनेनंतर दूधसागर धबधबा पर्यटकांसाठी बंद करणे अतिशय चुकीचे आहे. पर्यटकांना दूधसागरवर नेण्यासाठी कुळेतील ११० जणांना प्रशिक्षण देण्यात आले होते. आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बेकायदा पर्यटन मार्गदर्शकांना (गाईड) आयतीच संधी मिळाली आहे.
– मनीष लांबोर ( माजी सरपंच कुळे)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news