

पणजी : प्रभाकर धुरी
आई आणि गणेशला भेटून तेरवण मेढेतून मुळस - हेवाळेकडे गेलेला ओंकार गेले दोन दिवस त्याच परिसरात आहे. हेवाळे येथील ऑल्विन लोबो यांच्या घराच्या मागील जंगलात तो मुक्कामाला आहे.
हा परिसर त्याची जन्मभूमी असल्याने आणि त्याला खाण्यासारखा नैसर्गिक आहार या जंगल भागात असल्याने तो तिथे रमला आहे. त्याला या भागाची खडानखडा माहिती आहे. दिवसभर पुरेसे अन्न खायचे, पुरेशी झोप घ्यायची आणि त्याच भागात वावरायचे, आराम करायचा असा त्याचा दिनक्रम आहे. तिलारीतील नैसर्गिक अधिवास सोडून सावंतवाडी तालुका आणि गोवा राज्यात आलेला ओंकार तेव्हा पायाला भिंगरी लावल्यासारखा एक-एक गाव पादाक्रांत करत होता.
मात्र, तिळारी खोऱ्यात आल्यावर आणि विशेषतः त्यांच्या जन्मभूमीत आल्यावर ती भिंगरी तूर्त तरी थांबली आहे. या परिसरात हत्तींना पोषक खाद्य पुरेसे आहे, म्हणूनच ५ हत्तींचा कळपही गेले अनेक दिवस घाटीवडे बांबर्डे परिसरात स्थिरावला होता. ओंकार मेढे परिसरात आल्यानंतर तो कळप मंगळ मोडी परिसरातील जंगलातून घाटीवडे बांबर्डेतून मेढे धरणाजवळ आला होता. तेथे ओंकारची भेट झाली.
आई आणि गणेशसह छोटी मादी व दोन पिल्लांना भेटून, त्यांच्यासोबत काही तास राहून ओंकार सध्या मुळस हेवाळे परिसरात मुक्कामाला गेला आहे, तर त्याची आई, गणेश, छोटी मादी व दोन पिल्ले पाळये येथील बांबर - वायंगण परिसरात आहेत. धरणावरील भेटीत त्यांचा संवाद झाला असेल आणि त्यानुसार त्यांचा वावर सुरू असेल असे मानले जात आहे. सध्या ओंकार आणि कळप सुमारे पाच किलोमीटर परिसरात वावरत आहेत.
ओंकारची जीवनशैली बदलणार..?
ओंकार आता मानवी वस्तीतून नेहमीच्या, त्याला परिचित असलेल्या जंगल भागात आला आहे. इथे माणसांचा वावर कमी आहे. त्यामुळे त्याला आराम मिळेल. एका बाजूला तिळारी, तर दुसऱ्या बाजूला तेरवण मेढे धरण आहे. मुबलक पाणी, शरीराला बळकटी देणाऱ्या व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधी वनस्पती पुरेशा आहेत. त्यामुळे तो स्थिरावला असून त्याची जीवनशैली हळूहळू बदलेल आणि पुन्हा तो कळपात सामील होईल, असे हत्ती अभ्यासकांचे मत आहे.