

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
राज्यात विधानसभा आणि पंचायत निवडणुकांना मोठे महत्त्व दिले जाते. मात्र, यावेळेला जिल्हा पंचायत निवडणूक चुरशीची ठरली ती लोकप्रतिनिधींनी मोठे महत्व दिल्याने. म्हणूनच तर जाहीर प्रचार सभा, रॅल्या यांना फोंडा तालुक्यात अक्षरशः ऊत आलेला दिसला.
फोंडा तालुक्यातील सात जिल्हा पंचायत मतदारसंघातील निवडणुकीत सर्वाधिक मतदान हे उसगाव मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान हे कवळे जिल्हा पंचायत मतदारसंघात झाले. त्यामुळे वाढलेल्या मतांचा कोणाला फायदा होणार तर घटलेली मतांची टक्केवारीचा कोणाला फटका बसणार याची चर्चा सध्या सुरू आहे.
कवळे आणि प्रियोळात मगो पक्षाला अनुकूल वातावरण आहे. शिरोडा आणि उसगावात भाजपला अनुकूलता आहे. सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, प्रियोळचे आमदार तथा माजी मंत्री गोविंद गावडे तर वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची सत्वपरीक्षा या निवडणुकीतून पणाला लागली आहे.
कुर्टी मतदारसंघात एकूण १४२२१ मतदान झाले आहे. वेलिंग मतदारसंघात १३३२४, बेतकी १५०१३, उसगावात १०४५३, बोरीत १०१९९, शिरोड्यात ११२०८ तर कवळेत १३७०३ एवढे मतदान झाले आहे. त्यात आपल्याला किती मतदान झाले याची आकडेवारी काढण्यात निवडणुकीत उतरलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून आकडेमोड सुरू आहे.
सध्या सायलंट व्होटवर प्रत्येक उमेदवाराची भिस्त राहिली आहे. प्रत्येक उमेदवाराने मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केल्यामुळे आणि मतदारांनीही उमेदवारांनाही प्रतिसाद दिल्यामुळे मतदारांच्या मनात नेमके काय आहे हे समजणे मुश्किल ठरले आहे.
कवळे आणि प्रियोळ मतदारसंघात मगोचा उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला आहे. शिरोडा मतदारसंघात झालेला विकास हाच मतदारांच्या मतदानामागे प्रमुख कारण ठरणार असून भाजपच राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येतील असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.
बेतकी आणि कुर्टी मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने जिल्हा पंचायत स्तरावर भाजपच हवा आहे असे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.