

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील दोन जिल्हा पंचायतींच्या एकूण ५० जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज, सोमवार (दि. २२ डिसेंबर) रोजी सकाळी सुरू झाली आहे. राज्यातील १५ ठिकाणी ही मतमोजणी होत आहे.
मतदान मतपत्रिकेद्वारे घेण्यात आले असल्याने मतमोजणीला काहीसा उशीर लागणार आहे. तरीही दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यातील २५ जागांसाठी १११ उमेदवार, तर दक्षिण गोव्यातील २५ जागांसाठी ११५ उमेदवार असे एकूण ५० जागांसाठी २२६ उमेदवार रिंगणात आहेत.
भारतीय जनता पक्ष आणि मगो पक्ष यांची युती, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांची युती, त्याचबरोबर आम आदमी पक्ष आणि स्थानिक रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजी) अशी चौरंगी लढत यावेळी जिल्हा पंचायतीसाठी होत आहे.
काही मतदारसंघात अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तिसवाडी-पणजी परिसरातील मतदारसंघाची मतमोजणी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी येथे सुरू आहे.