

पणजी : ओंकार हत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथील सर्किट बेंच आज, सोमवारी काय निर्णय देते, याकडे पर्यावरणवादी आणि ओंकार प्रेमींचे लक्ष आहे. दुसरीकडे गोव्यात 14 दिवस राहून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेलेला ओंकार 63 दिवसांनी शनिवार, दि.30 नोव्हेंबर रोजी पुन्हा गोव्यात परतला आहे.
रविवारी संध्याकाळी तो मुंबई-गोवा महामार्गाजवळ पत्रादेवी-कडशी परिसरात सिंधुदुर्ग सीमेजवळ होता. गोव्यातील वन कर्मचारी त्याला गाळेलमार्गे पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यासाठी आटापिटा करत आहेत, तर महाराष्ट्रातील वन कर्मचारी त्याला तिळारी खोऱ्यातील जंगलात पाठवण्याऐवजी गोव्यात ढकलत आहेत, असा गोव्यातील कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
दुसरीकडे गोव्यातील वन कर्मचारी ओंकारला परत पाठविण्यासाठी फटाके, ॲटम बॉम्बचा वापर करत असल्याने बांदा परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, ओंकारप्रेमी संताप व्यक्त करीत आहेत. ओंकार माणसाळलेला असून, त्याला पाळीव जनावराप्रमाणे ऊस किंवा भेडले माडाच्या फांद्या खायला देत कुठेही नेता येत असताना गोव्यात त्याच्यावर फटाके, ॲटम बॉम्ब टाकून त्याला शारीरिक व मानसिक त्रास देऊ नये, अशी ओंकार प्रेमींची मागणी आहे. ओंकारच्या अंगावर फटाके फोडून, काठीने मारहाण करून पुन्हा त्रास दिला जाऊ नये व त्याला वनतारा ऐवजी तिळारीत पाठवावे, यासाठी आज चौथ्या दिवशी बांद्यात उपोषण सुरू आहे.
ओंकार ला वनतारात तात्पुरता नेण्याचे व त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले होते. मात्र, ओंकारला पकडण्याच्या कार्यवाहीबाबत वनताराकडून वनविभाग आणि सरकारच्या पत्रांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती वन विभाग व राज्य सरकारने न्यायालयाला दिल्याने सोमवार, दि.1 डिसेंबर रोजी उच्च स्तरीय समितीची स्थापना व वनताराची ओंकारला पकडण्यासाठीची तयारी व पूर्ततेबाबतची माहिती सादर करण्यास सांगितली आहे. त्यावर आता महाराष्ट्राचा वन विभाग काय अहवाल देतो आणि त्यावर न्यायालय काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.