

प्रभाकर धुरी
पणजी : गोव्यातून 27 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात मडुरे रेखवाडीत गेलेला ओंकार हत्ती तब्बल 63 दिवसांनी पुन्हा गोव्याच्या सीमेवर आला आहे.
वाफोली,निमजगा येथून तो शनिवारी सायंकाळी पत्रादेवीजवळ सटमटवाडीत पोहोचला. तिथून तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील नव्या टोल नाक्याच्या पाठीमागे होता. येथून तो डोंगरपाल, डिंगणेमार्गे कळणेकडे जाऊ शकतो किंवा गोव्यातील कडशी, फकीरफाटा येथेही येऊ शकतो. मागच्या वेळेला ओंकार डिंगणे , खोलबाग, कडशी, फकीरफाटा या मार्गाने चांदेल व मोप भागात आला होता.त्यामुळे सीमेवर आलेला ओंकार गोव्यातून परत जातो की पुन्हा गोव्यात येतो हे पाहावे लागेल.
ओंकारला गुजरातमधील वनतारात नेण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे,आमदार दीपक केसरकर आणि वनविभाग आग्रही आहेत. न्यायालयाने त्याला तात्पुरता वनतारात नेण्याची परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्र वनविभागाकडून हत्ती पकडबाबत आवश्यक माहिती वनताराकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्याने न्यायालयाला सादर केलेली नाही. ती सोमवारी सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. त्याला पकडून नेण्याची तयारी म्हणून वन कर्मचाऱ्यांनी त्याला गेले 63 दिवस मडुरे ,कास,सातोसे,रोणापाल, निगुडे,इन्सुली, वाफोली, ओटवणे, भालावल, डेगवेकडे गेलेल्या ओंकारला पुन्हा मागे आणून इन्सुली आणि वाफोली परिसरात रोखून धरत तिळारीकडे जाण्यापासून अटकाव केला होता. अखेर ओंकार वाफोलीतून गवळीटेंब, निमजगामार्गे गोव्यातील पत्रादेवीजवळ असलेल्या सटमटवाडीत पोचला. आता सध्या तो महामार्गालगत असून तो पुन्हा सिंधुदुर्गात सटमटवाडीत किंवा डोंगरपालकडे जातो की पुन्हा गोव्यात येतो हे कळेल.
सिंधुदुर्गात तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच
ओंकारला वनतारात न नेता तिळारीत पुन्हा नेऊन कळपात सोडावे यामागणीसाठी बांदा येथे ओंकार प्रेमींनी मुंडण आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरू केले आहे.मुख्य आंदोलनकर्ते गुणेश गवस यांची तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आपल्या मागण्या पूर्ण होत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ओंकारप्रेमींनी दिला आहे.