

बांदा : ओंकार हत्तीवरील अत्याचार प्रकरण पुन्हा चिघळले असून त्याला दोडामार्गच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याच्या मागणीसाठी बांदा येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण रविवारी तिसऱ्या दिवशीही अखंडित सुरू राहिले. उपोषण मागे घेण्याबाबत वनविभागाने दिलेल्या लेखी विनंतीला आंदोलनकर्त्यांनी ठाम नकार देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
शनिवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी उपोषणकर्ते गुणेश गवस यांची प्रकृती बिघडली होती. प्राथमिक उपचारांनंतर रविवारी सकाळी ते पुन्हा उपोषणस्थळी दाखल झाले आणि साखळी उपोषणात सहभागी झाले. दरम्यान दिवसभर वनविभागाच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने आंदोलकांची भेट घेतली लाही. सायंकाळी इन्सुलीचे वनरक्षक अतुल पाटील आणि वनपाल प्रमोद राणे यांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा केली. यावेळी उपोषणकर्ते मंदार गावडे यांना दिलेल्या अधिकृत पत्रात उपोषण थांबवण्याची विनंती करण्यात आली असून, आरोग्य बिघडल्यास वनविभाग जबाबदार राहणार नाही, असा उल्लेख करण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली.
‘ओंकार’चा गोवा राज्यात प्रवेश
दरम्यान, ओंकार हत्तीने रविवारी अचानक सटमटवाडीपत्रादेवी मार्गे गोव्याच्या सीमेत प्रवेश केला. सकाळी तो गवळीटेंब, निमजगा आणि सटमटवाडी भागात मुक्तपणे फिरताना दिसला होता. गोवा वनविभागाने त्याला सीमेजवळ थांबवण्याचा प्रयत्न करत सुतळी बॉम्बचा वापर केला, मात्र ओंकार सरळ गोव्याच्या सीमेकडे निघाला, असे ग्रामस्थांनी सांगितले.
वनाधिकाऱ्यांनी ‘ओंकार’ला मुद्दाम गोव्यात ढकलले!
हत्ती सीमारेषा ओलांडल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, बांद्यात सुरू असलेल्या उपोषणाला धक्का लावण्यासाठीच वनविभागाने ओंकारला मुद्दाम गोव्याच्या दिशेने ढकलले. दुपारनंतर ओंकारने गोवा राज्यातील तोरसे-दुजगी परिसरात प्रवेश केला असून संध्याकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील पेट्रोलपंपाजवळ त्याचा वावर दिसला. गोवा वनविभागाचे पथक त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.