

पणजी : प्रभाकर धुरी
ओडिशा येथील युवक ठिकठिकाणी मध काढण्यासाठी मधमाश्यांच्या पोळ्यांचा शोध घेत आहेत. यातून या युवकांना उत्पन्न, तर ज्यांच्या बागेत किंवा इमारतीवर पोळे असेल, त्यांची मधमाश्यांपासून सुटका होत आहे. ओडिशा येथील राहुल व साहिल मंडल यांची माडेल चोडण येथे भेट झाली. येथील प्राथमिक शाळेजवळ रस्त्यावरच ते झाडावरून काढलेल्या पोळ्यातील मध गोळा करून विकत होते.
आपण शुद्ध मध ६०० रुपये किलो दराने विकतो, असे राहुल याने सांगितले. राहुल, साहिल असे काही युवक ओडिशा येथून गोव्यात आले आहेत. त्यांच्या राज्यात ते जिथे राहतात, तिथे घनदाट जंगल आहे. मधमाश्या झाडांवर पोळे बांधतात.
रानातील पोळे हेरून ते खाली उतरवले जाते आणि त्यातील मध गोळा करून विकले जाते. त्यांना याचा अनुभव असल्याने ३ वर्षांपूर्वी काही युवक गोव्यात आले. ग्रामीण भागात फिरून त्यांनी कुठे मधमाश्यांचे पोळे आहे का, याची माहिती मिळविण्यास सुरूवात केली आणि त्यांना उत्पन्नाचे साधन मिळत गेले.
शहराच्या ठिकाणी मधमाश्या इमारतींच्या सज्जा (लॉफ्ट) खाली, कुठेतरी कोपऱ्यात पोळे तयार करतात. काहीवेळा मोबाईल टॉवरवर आणि उंच झाडावरही त्या पोळे बनवतात. ज्यांच्या जागेत हे पोळे असते, त्यांना मधमाश्यांची भीती वाटते. अर्थात काही मध डंख मारतात, तर काही डंख मारत नाहीत. डंख मारणाऱ्या प्रजातींमधील काही मधमाश्या डंख मारल्यावर मरतात. असे असले, तरी पोळे बघितले की मधमाश्यांची प्रत्येकाला भीती वाटते.
मात्र, राहुल आणि त्याचे साथीदार पोळे काढून त्यातील मध वेगळे काढून विकतात. त्यांनी या मेहनतीच्या व जोखमीच्या कामातून रोजगार शोधला असून ज्यांच्या झाडावर किंवा इमारतीवर पोळे असते, ते त्यांना पोळे फुकट न्यायाला सांगतात. कधी कधी ३, तर कधीकधी १० किलोपर्यंत मध मिळते, असे राहुल म्हणाला. राज्यात रोजगार नाही, राज्यात बाहेरच्यांची सगळे रोजगार हडपले, असे आरोप होतात. मात्र, अशा कामातील जोखीम आणि मेहनत कुणी लक्षात घेत नाही. ती समजून घेण्याची गरज आहे.
पृथ्वीवरील जीवनासाठी मधमाश्या आवश्यक
मधमाश्या पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहेत, कारण त्या परागीभवन करतात, पर्यावरणाचा समतोल राखतात. थोर शास्त्रज्ञ व विचारवंत अल्बर्ट आइनस्टाईन म्हणाले होते की, मधमाश्या नष्ट झाल्यास मानव जास्त काळ जगू शकणार नाही.
30 ग्रॅम मध आणि जगभर उड्डाण
मधमाश्यांबद्दल वैशिष्टपूर्ण गोष्ट म्हणजे ३० ग्रॅम मधापासून मिळणाऱ्या ऊर्जेतून मधमाशी संपूर्ण जगभर उडू शकते. मधमाश्या मेणाची षटकोनी घरे (पोळे) बनवतात, ज्यात त्या मध, पराग साठवतात आणि पिल्लांची वाढ करतात. पोळ्यात एक राणी माशी (अंडी घालणारी), अनेक कामकरी माश्या (नर आणि मादी) आणि काही नर असतात. एका पोळ्यात हजारो माश्या असू शकतात. फुलांमधून मकरंद गोळा करून, शरीरातील विशिष्ट एन्झाईम मिसळून, पोळ्यात पंख हलवून त्यातील पाणी उडवून मध तयार करतात. हा मध हिवाळ्यासाठी अन्न म्हणून साठवला जातो.