

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
म्हापसा धुळेर येथील एका खासगी इस्पितळाची चक्क रूग्णवाहिका चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी प्रदीप देवू खलप (रा. पिर्ण बार्देश) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपी हा सध्या मानसिक रुग्णालयात उपचार घेत आहे. दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार, ही चोरीची घटना गुरुवार, दि. ११ रोजी सकाळी ५.५० वाजता घडली. या चोरलेल्या रुग्णवाहिकेची किंमत १० लाख रुपये आहे.
याप्रकरणी इंतेखालो अब्बास शेख यांनी पोलिसांत तक्रार केली. इस्पितळ इमारतीच्या तळमजल्यावर जीए ०३ एएच ४२५० क्रमांकाची रूग्णवाहिका पार्क केली होती. ही रुग्णवाहिका संशयित आरोपीने सुरू केली व ती घेऊन त्याने पळ काढला.
संशयित हा रूग्णवाहिका घेऊन थेट बांबोळी येथे मनोरूग्णालयात गेला. नंतर तिथून पुन्हा तो ही रुग्णवाहिका घेऊन पिर्ण येथे घरी जात होता. त्यावेळी रेवोडा येथे म्हापसा पोलिसांनी ही रुग्णवाहिका अडवली व संशयिताला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत संशयित खलप हा मानसिक रूग्ण असल्याचे आढळून आले. भा. न्या. संहितेच्या ३०५ (अ) कलमान्वये पोलिसांनी या चोरी प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास म्हापसा पोलिस करीत आहेत. दरम्यान, इस्पितळाच्या वाहन चालकाने रुग्णवाहिकेलाच चावी लावून ठेवली होती. संशयित हा पूर्वी एका खासगी इस्पितळामध्ये वाहन चालक म्हणून नोकरीला होता. त्यामुळे त्याला रुग्णवाहिका चालवता येत होती.